ब्रेकिंग : कर्नल सोफिया कुरेशी विधानप्रकरणी विजय शाहंना दणका; SIT स्थापन करण्याचे SC चे आदेश

  • Written By: Published:
ब्रेकिंग : कर्नल सोफिया कुरेशी विधानप्रकरणी विजय शाहंना दणका; SIT स्थापन करण्याचे SC चे आदेश

Supreme Court Rejects BJP Minister Vijay Shah’s Apology Orders to Form SIT :  कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांना फटकारत शाह यांच्याकडून दाखल करण्यात आलेला माफीनामादेखील फेटाळून लावला आहे. तसेच या प्रकणाची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्याचे निर्देश मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत.

ही कोणत्या प्रकारची माफी आहे?

शहा यांच्या वकिलाने सांगितले की, सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या विधानाप्रकरणी मंत्री विजय शाह यांनी माफी मागितली आहे. त्यावर प्रतिप्रश्न उपस्थित करत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटले की, ही कोणत्या प्रकारची माफी आहे. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात, त्यामुळे तुम्ही बोलताना तुमच्या शब्दांची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही चुका करता आणि न्यायालयात आल्यानंतर माफी मागाता असेही न्यायालायाने शाह यांना सुनावले.

माफी मागणारा व्हिडिओ दाखवा

तुम्ही एक जबाबदार आणि अनुभवी राजकारणी आहात असे सांगत तुम्ही नेमकी कशासाठी माफी मागितली याचे व्हिडिओ दाखवा असे न्यायालयाने सांगितले. तुम्ही माफी कशी मागितली हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. काही लोक हातवारे करून माफी मागतात. तर, काही फक्त मगरीचे अश्रू ढाळतात. त्यामुळे तुम्ही नेमकी कशी मागितली हे न्यायालयाला जाणून घ्यायचे आहे.

SIT मध्ये कोण-कोण अधिकारी?

भाजप मंत्री विजय शाह यांच्या विधानाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने SIT स्थापन करण्याचे आदेश मध्य-प्रदेश सरकारला दिले आहेत. यात तीन आयपीएस अधिकारी असतील. जे मध्यप्रदेशातील नसतील. तसेच यात एक महिला अधिकाऱ्याचाही समावेश असेल असे निर्देश देत मंगळवारी (दि.20) सकाळी १० वाजेपर्यंत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देत एसआयटीने २८ मे पर्यंत स्थिती अहवाल सादर करण्यासही सर्वोच्च न्यायालायने सांगितले आहे.

काय म्हणाले होते विजय शाह?

मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी सोफिया कुरेशी (Colonel Sofia Qureshi) यांना  ‘पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांची बहीण’ म्हटले होते. ज्यांनी भारताच्या मुलींना विधवा केले त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्याच बहि‍णीच्या मदतीने धडा शिकवला, असे शाह म्हणाले होते.

शाह यांनी मागितली माफी 

वादग्रस्त विधानानंतर शाह यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठवली जात होती. त्यानंतर शाह यांनी त्यांच्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. मी दहा वेळा माफी मागायला तयार आहे. माझ्याकडून चुकून अपशब्द निघाले, असे म्हणच माफी मागितली होती. माझे संपूर्ण कुटुंब, कुळ लष्करी आहे. माझ्या कुटुंबातील अनेक लोक कारगिल आणि इतर ठिकाणी शहीद झालेत, असंही शाह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube