तब्बल 2 किलो सोनं, 40 लाख कॅश; तेलंगणात सरकारी अधिकाऱ्याच्या घरात 100 कोटींचं घबाड!
Telangana News : देशभरात भ्रष्ट नेते, सरकारी अधिकारी यांच्यावर छापे टाकून त्यांच्याकडील अफाट संपत्ती जप्त केली जात आहे. झारखंडधील काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे दोनशे कोटींपेक्षा जास्त संपत्ती आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता काँग्रेसशासित राज्य तेलंगणातूनही (Telangana) पुन्हा अशीच बातमी समोर येत आहे. तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरी आणि कार्यालयावर एकाच वेळी छापे टाकले. या छाप्यात कोट्यावधींचे घबाड हाती लागले. तब्बल 100 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये 60 महागडी घड्याळे, 40 लाख रुपये, दोन किलो सोने, चल-अतल मालमत्तेची कागदपत्रे, 14 मोबाइल, 10 लॅपटॉप यांचा समावेश आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 14 पथकांनी काल दिवसभर तपास केला. त्यानंतर आजही तपास करण्यात येत आहे. तेलंगणा स्टेट रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटीचे सचिव आणि मेट्रो रेल्वेचे नियोजन अधिकारी एस. बालकृष्ण यांच्या घरासह विविध ठिकणी ही छापेमारी करण्यात आली. त्यांच्या नातेवाईकांच्या घरीही तपासणी करण्यात आली. या तपासादरम्यान 100 कोटींहून आधिक मालमत्ता जप्त करण्यात आली.
तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अद्याप बालकृष्ण यांचे बँकेतील लॉकर्स उघडलेले नाहीत. आतापर्यंत किमान चार लॉकरची ओळख पटली आहे. आणखीही काही लॉकर असतील. या लॉकरमध्येही पैसे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याकडील संपत्तीचा आकडा आणखी वाढू शकतो. या कारवाईने राज्यात मात्र खळबळ उडाली आहे. राजकारणी नेत्यांप्रमाणेच सरकारी अधिकारीही किती भ्रष्ट असतात हेच यातून दिसून येत आहे.