भारत नको, पुन्हा ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ करा! रिव्हर्स गिअरसाठी के. चंद्रशेखर राव यांच्यावर दबाव वाढला
हैदराबाद : तेलंगण अस्मिता हाच पक्षाचा गाभा असल्याने पक्षाला पुन्हा जुने तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) हे नाव द्यावे अशी मागणी भारत राष्ट्र समितीच्या (BRS) माजी मंत्री, आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर रिव्हर्स गिअर टाकण्यासाठी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्यावर दबाव वाढल्याचे बोलले जात आहे. (Bharat Rashtra Samithi (BRS) have demanded that the party be renamed as the old Telangana Rashtra Samithi (TRS).)
नुकत्याच पार पडलेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव झाला. सलग दोनवेळा सत्ता स्थापन केलेल्या पक्षाला अवघ्या 39 जागांवर समाधान मानावे लागले. तर 64 जागा जिंकत काँग्रेसने दणदणीत विजय मिळविला. त्यानंतर आता भारत राष्ट्र समिती (बीआरएस) मध्ये आता पक्षाचे नाव बदलण्याच्या विचाराने जोर धरला आहे. पक्षाचे अनेक माजी मंत्री, विद्यमान खासदार, माजी आमदार यांच्यासह प्रमुख नेते देखील पक्षाला पुन्हा ‘टीआरएस’ नाव देण्याची मागणी करत आहेत.
‘बीआरएस’चे पुन्हा ‘टीआरएस’ करा
लोकसभा निवडणुकीसाठी ‘बीआरएस’ची तयारी सुरू झाली असून त्यासाठी आयोजित पक्षाची बैठक 22 जानेवारीपर्यंत चालणार आहे. याच बैठकीमध्ये ही मागणी केली जात आहे. या बैठकीत पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव, माजी मंत्री हरीश राव, कादियाम श्रीहरी, पोचारम श्रीनिवास रेड्डी आणि निरंजन रेड्डी यांच्यासह नेते सहभागी होत आहेत. या बैठकीदरम्यान कार्यकत्यांना आपले विचार मांडण्याची संधी दिली जात आहे. बैठकीत लोकसभेची रणनिती आखली जाणार आहे.
काय आहे मागणी?
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षातील कार्यकत्यांनी पक्ष व्यवस्थेतील विस्कळितपणा, कामकाजाचा अभाव तसेच संघटनात्मक मुद्दे उपस्थित करत चिंता व्यक्त केली. टीआरएस पक्षाची स्थापना मुळातच तेलंगणला राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी केली होती, त्यामुळे बीआरएसचे नाव पुन्हा टीआरएस करावे. टीआरएस’ नाव दिल्यास जनतेची नाराजी दूर होईल आणि दुरावलेले मतदार पुन्हा पक्षाकडे येतील असा विश्वास यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.