Refined Oil : महागाईने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना दिलासा : मोदी सरकारचा मोठा निर्णय
Refined Oil : नवी दिल्ली : वाढत्या महागाईने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी पावलं उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून सरकारने आयात शुल्कात कपात केली आहे. सरकारने सोयाबीन तेल आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क 17.5 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर आणले आहे. (The government has decided to reduce the import duty on refined soya oil and refined sunflower oil.)
एक परिपत्रक काढून केंद्राने याबाबतच निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, आता सर्व प्रकारच्या कच्च्या तेलावर म्हणजे पाम तेल, सूर्यफूल तेल आणि सोया तेलावर 5 टक्के आयात शुल्क म्हणजेच एकूण 5.5 टक्के कर लागू होणार आहे. तर रिफाईंड खाद्य तेलावर प्रभावी आयात शुल्क 13.75, आणि 10 टक्के उपकर लागू होणार आहे.
आयात शुल्क किती कमी केले :
सरकारच्या निर्णयानंतर सर्व प्रकारच्या कच्च्या तेलावर म्हणजेच कच्चे पाम तेल, कच्चे सूर्यफूल तेल आणि कच्च्या सोया तेलाच्या आयातीवर आता 5 टक्क्यांपर्यंत शुल्क लागणार आहे. यावर आता एकूण ५.५ टक्के कर आकारला जाणार आहे. तर रिफाइंड खाद्यतेलावर 13.75 टक्के आयात शुल्क आकारण्यात येणार आहे. यावर 10 टक्के उपकर लागणार आहे. खाद्यतेलाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
पाम तेलाच्या उत्पादनात वाढ :
नोव्हेंबर 2022 ते एप्रिल 2023 या कालावधीत पाम तेलापासून बनवलेल्या उत्पादनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 32 लाख मेट्रिक टनांपर्यंत पामतेल उत्पादनांची आयात करण्यात आली होती, ती यंदा 59 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढली आहे. पाम तेलाच्या आयातीत 61 टक्के वाढ झाली आहे, तर इतर तेलांची आयात केवळ 41 टक्क्यांपर्यंतच राहिली आहे.
भारत सर्वात मोठा खरेदीदार देश :
भारत हा खाद्य तेलाचा जगातील सर्वात मोठा खरेदीदार आहे. भारतातील खाद्य तेलाची आयात 60 टक्क्यांपर्यंत आहे. भारतात दरवर्षी सुमारे 24 मेट्रिक टन खाद्यतेलाचा वापर होतो. त्यापैकी सुमारे 14 मेट्रिक टन तेल आयात केले जाते.