अखिलेश, काँग्रेसला ‘भिकारी’ समजला का?; युपीत BJP ला घरी पाठवणाऱ्यांमध्येचं जुंपली…
UP Assembly Election 2027 उत्तर प्रदेश... देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारं राज्य पण, 2027 विधानसभा निवडणुकांपूर्वीच विरोधकांमध्ये जागावाटपावरून रणकंदन
UP Assembly Election 2027 : उत्तर प्रदेश… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारं राज्य पण, 2027 च्या विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजण्याआधीच विरोधकांच्या INDIA आघाडीत जागावाटपावरून रणकंदन सुरू झालंय.. एकीकडे भाजपला सत्तेतून खाली खेचण्याच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे मित्रपक्षालाच राजकीय ताकद दाखवायची… असा काहीसा खेळ सध्या अखिलेश यादव आणि काँग्रेसमध्ये सुरू झालाय. त्यात काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी ‘आम्ही अखिलेश यादवांच्या खैरातीची वाट पाहणारे भिकारी नाही’, असा थेट इशारा दिलाय त्यामुळे निवडणुकांच्या तारखंची घोषणा होण्यापूर्वीच युपीत राजकीय तोफा धडाडण्यास सुरूवात झाली आहे. नेमकं समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये कशावरून भांड्याला भांड लागलंय की, काँग्रेसच्या खासदाराला थेट काँग्रेस ‘भिकारी’ म्हणण्याची वेळ आलीये जाणून घेऊया…
आता नेमकं काय झालं ते बघूया तर, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेसला 26 जागांचा प्रस्ताव दिला. पण, काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य आहे की नाही, यावर चर्चा सुरू असतानाच अखिलेश यांनी पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विशेष म्हणजे, काँग्रेस दावा करत असलेल्या सहारनपूरमधील दोन जागांवरही समाजवादी पक्षाने उमेदवार उतरवताच काँग्रेसचा संयम सुटला आणि काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी थेट अखिलेश यादव यांना ‘हम भिखारी नहीं हैं… अखिलेश यादव की खैरात का इंतजार नहीं करेंगे!’ असे खडेबोल सुनावले.. म्हणजेच काय तर, जागा द्यायच्या असतील तर सन्मानाने द्या, नाहीतर काँग्रेस स्वतःच्या ताकदीवर मैदानात उतरेल, असा स्पष्ट संदेशच मसूद यांनी अखिलेस यांच्या समाजवादी पक्षाला दिलाय. पण, प्रश्न एवढाच नाही की काँग्रेसला किती जागा मिळणार? प्रश्न आहे तो उत्तर प्रदेशात विरोधकांचा नेता कोण? मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण? कारण भाजपशी लढण्याआधीच मित्रपक्षांमध्येच कुरघोडी सुरू झालीय..
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची ताकद मोठी आहे. त्यामुळे जिंकण्याची क्षमता, स्थानिक राजकीय समीकरणं आणि PDA अर्थात पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक या समीकरणाच्या आधारे जागांचं समायोजन झालं पाहिजे. अखिलेश यांनी याला जागावाटपाऐवजी ‘सीट अॅडजस्टमेंट’ म्हटलंय. पण, पण इथेच खरी गोम आहे… समाजवादी पक्षाला आपल्या प्रभावाच्या जागा सोडायच्या नाहीत आणि काँग्रेसला केवळ काही जागांवर समाधान मानायचं नाही. काँग्रेसला उत्तर प्रदेशात आपला राजकीय पाया पुन्हा मजबूत करायचाय. त्यामुळे 26 जागांचा आकडा काँग्रेससाठी राजकीयदृष्ट्या अपुरा ठरू शकतो. म्हणजेच अखिलेश यांना आघाडी हवीय, पण जागांवर तडजोड किती करायची, याची सूत्रं स्वतःकडेच ठेवायची आहेत, असं चित्र दिसतंय….
या संपूर्ण वादातील सर्वात स्फोटक विधान म्हणजे इमरान मसूद यांचं ‘हम भिखारी नहीं हैं’ हे वक्तव्य…आता काँग्रेस खासदार थेट भिकारी म्हणण्यावर का आले तर, या वादाचा केंद्रबिंदू ठरलंय ते सहारनपूर…. कारण, काँग्रेस खासदार इमरान मसूद यांचा राजकीय प्रभाव असलेल्या सहारनपूरमध्ये समाजवादी पक्षाने दोन जागांवर उमेदवार जाहीर केलेत. यामध्ये सहारनपूर आणि बेहट या जागांवर काँग्रेसही दावा करत होती. आता एकीकडे जागावाटपाची चर्चा करायची आणि दुसरीकडे मित्रपक्षाच्या दाव्याच्या जागांवर उमेदवार घोषित करायचे, ही कोणती आघाडीची संस्कृती? असाच सवाल इमरान मसूद यांनी उपस्थित केलाय.
मसूद यांच्या मते, एकीकडे चर्चा सुरू ठेवायची आणि दुसरीकडे एकतर्फी निर्णय घ्यायचे, याचा अर्थ समाजवादी पक्ष आघाडीबाबत गंभीर नसल्याचे म्हटलंय. एवढेच काय तर, त्यांनी तर आघाडीची चर्चा पुढे सुरू ठेवायची की नाही, याचाही निर्णय काँग्रेसमध्ये घ्यावा लागेल, असं स्पष्ट केलंय. म्हणजेच काँग्रेस आता केवळ जागांसाठी नव्हे, तर आपल्या राजकीय अस्तित्वासाठीही संघर्ष करणार असल्याचे संकेत यावरून मिळत असल्याचे चित्र आहे.
आता प्रश्न असा आहे की, अखिलेश यादव असं का करतायत? तर, या संपूर्ण घडामोडींची तुलना 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या जागावाटपाच्या राजकारणाशी केली जात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही समाजवादी पक्षाने उमेदवार जाहीर करण्याच्या माध्यमातून जागावाटपाच्या चर्चेत आपली भूमिका मजबूत केली होती. त्यानंतर काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात जागावाटपाचा समझोता झाला आणि दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली.
अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचं वर्चस्व कायम ठेवायचं आहे. त्यामुळे आता 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी अखिलेश यादव यांच्याकडून पुन्हा 2024 सारखाचं राजकीय डाव खेळला जातोय का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पण, काँग्रेसला मात्र केवळ समाजवादी पक्षाच्या ताकदीवर निवडणूक लढवायची इच्छा नाहीये… कारण काँग्रेसला प्रत्येक निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या सावलीत राहायचं असेल, तर उत्तर प्रदेशात स्वतःचं संघटन मजबूत कसं होणार? त्यामुळेचं दोन्ही पक्षातील हा वाद केवळ दोन जागांचा किंवा 25 जागांचा नाही. तर, हा वाद आहे राजकीय प्रतिष्ठेचा आणि भविष्यातील नेतृत्वाचा…
काँग्रेससमोर आता दोनच मोठे पर्याय आहेत. एक म्हणजे अखिलेश यांच्याशी तडजोड करून आघाडी टिकवायची किंवा दुसरा म्हणजे आपल्या ताकदीनुसार अधिक जागांची मागणी करत राजकीय दबाव वाढवायचा. मात्र, यापैकी कोणताही निर्णय सोपा नाही.त्यामुळे आता या संपूर्ण राजकीय संघर्षात तीन प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत.
पहिला म्हणजे, अखिलेश यादव काँग्रेसला २६ जागांच्या पलीकडे किती जागा देण्यास तयार होणार का? दुसरा म्हणजे, काँग्रेस आपल्या दाव्याच्या जागांवर तडजोड करणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी करणार? आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, भाजपला सत्तेतून हटवण्याचं स्वप्न पाहणारी INDIA आघाडी उत्तर प्रदेशात निवडणुकीआधीच आपापसातील मतभेद मिटवू शकणार का? कारण राजकारणात केवळ जागांचं गणित महत्त्वाचं नसतं, तर सन्मान, नेतृत्व आणि वर्चस्वाचं गणितही तितकंच महत्त्वाचं असतं.
पण, निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्यापूर्वी उत्तर प्रदेशात भाजपला परभूत करून घरी बसवण्याची भाषा करणाऱ्या विरोधकांमध्येच एकजूट झाली तर, या संपूर्ण संघर्षाचा सर्वात मोठा फायदा भाजपला नक्कीच होऊ शकतो? कारण उत्तर प्रदेशात भाजपला आव्हान देण्यासाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची एकजूट फार महत्त्वाची आहे. पण, दोन्ही पक्षांच्या महत्त्वाकांक्षांचा संघर्ष आता जागावाटपाच्या टेबलावर पोहोचलाय आणि भाजपसाठी हीच राजकीय संधी ठरू शकते. त्यामुळे 2027 च्या निवडणुकीआधीच उत्तर प्रदेशात मित्रपक्षांमधील ही लढाई कोणतं वळण घेते, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
VIDEO | Lucknow: As Samajwadi Party releases list of five candidates for UP Polls, Congress MP Imran Masood (@Imranmasood_Inc) says, “Whatever is happening here, it seems that there is a lack of seriousness in this matter. There is a lack of seriousness because while you (Samajwadi Party) are holding talks on one side, you are making declarations on the other, which indicates that this is not being taken seriously. Discussions were being held in a serious manner, and people were sitting together and talking seriously, but suddenly this has happened. So, now we will discuss within our party what we should do, whether we should sit for talks or not, because the decision on what to do in this situation will be taken by the party. When you have made this declaration against me, I don’t understand whether you want to fight me, the Congress, or the BJP? It has to be decided, doesn’t it, whether you want to fight the BJP or fight us? So, what can I say about this?”
(Full video available on PTI Videos – https://t.co/bIyFWTfmBd)
— Press Trust of India (@PTI_News) November 25, 2026