केरळमध्ये झाला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी; कोण आहेत व्ही. डी. सतीशन?
व्ही. डी. सतीशन यांचं पूर्ण नाव वडासेरी दामोदर सतीशन आहे. त्यांचा जन्म ३१ मे १९६४ रोजी केरळमधील कोची येथील नेटूर येथे एका नायर कुटुंबात झाला.
काँग्रेसचे नेते व्ही. डी. सतीशन (Keral) यांनी आज प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सतीशन यांच्या शपथविधीनंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर वीस मंत्र्यांनीही पदाची शपथ घेतली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी, वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी उपस्थित होत्या.
नव्या मंत्रिमंडळात १४ आमदार प्रथमच मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारत आहेत. यामध्ये सी.पी. जॉन, एन. शमसुद्दीन, के.एम. शाजी, पी.के. बशीर, व्ही.ई. अब्दुल गफूर, पी.सी. विष्णुनाथ, रोजी एम. जॉन, बिंदू कृष्णा, टी. सिद्दीकी, के.ए. थुलसी आणि ओ.जे. जनीश यांचा समावेश आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदी तिरुवनचूर राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी शनिमोल उस्मान यांची निवड करण्यात आली आहे.
या शपथविधी सोहळ्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते. एकूणच, सतीशन यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारकडून राज्याच्या विकासाबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात असून, येणारा काळ या सरकारसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
26 मे रोजी केरळ, 6 जूनपर्यंत कोकण आणि 7 जूनला पुण्यात मान्सूनचं आगमन; हवामान विभागाचा अंदाज
61 वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच असा शपथविधी सोहळा पार पडला. यापूर्वी, राज्याचे तिसरे काँग्रेस मुख्यमंत्री आर. शंकर यांनी 1962 मध्ये त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह शपथ घेतली होती. परंतु, 1964 मध्ये अविश्वास ठरावानंतर त्यांचं सरकार कोसळलं होतं.त्यामुळे सध्याचा हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे.
कोण आहेत सतीशन?
व्ही. डी. सतीशन यांचं पूर्ण नाव वडासेरी दामोदर सतीशन आहे. त्यांचा जन्म ३१ मे १९६४ रोजी केरळमधील कोची येथील नेटूर येथे एका नायर कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव के. दामोदर मेनन आणि आईचं नाव व्ही. विलासिनी अम्मा आहे. सतीशन यांनी केरळ स्टुडंट्स युनियनच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. विद्यार्थीदशेत ते एक प्रभावी नेते बनले आणि १९८६-१९८७ दरम्यान महात्मा गांधी युनिव्हर्सिटी युनियनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी काँग्रेसची विद्यार्थी शाखा असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव म्हणूनही काम केलं आहे.
सतीशन हे प्रशिक्षित वकील आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून सक्रिय राहिले आहेत. त्यांनी जवळपास १० वर्षे केरळ उच्च न्यायालयात वकिली केली आहे. वकिली करत असताना त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९६ मध्ये परवूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. हा मतदारसंघ तेव्हा कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला होता आणि त्यात त्यांचा सीपीआयचे उमेदवार पी. राजू यांच्याकडून पराभव झाला. या पराभवानंतरही सतीशन मतदारसंघात सक्रिय राहिले.
२००१ मध्ये, परवूर मतदारसंघातून पहिल्यांदा केरळ विधानसभेवर निवडून आल्यावर त्यांनी पहिले मोठे राजकीय यश मिळाले. पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर व्ही. डी. सतीशन यांनी मागे वळून पाहिलं नाही हा मतदारसंघ त्यांची राजकीय प्रयोगशाळा आणि लाँचपॅड बनला. २००१ पासून ते येथे एकही निवडणूक हरले नाहीत आणि सलग सहा वेळा (२००१, २००६, २०११, २०१६, २०२१ आणि २०२६) आमदार म्हणून निवडून आले आहेत.
२००६ मध्ये त्यांनी के. एम. दिनकरन यांचा पराभव केला, तर २०११ मध्ये सीपीआय(एम)चे पन्नियन रवींद्रन आणि २०१६ मध्ये शारदा मोहन यांसारख्या प्रमुख डाव्या नेत्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्यांनी आपल्या मतदारसंघात तळागाळातील उपक्रम सुरू केले, जसे की लाखो रहिवाशांसाठी एक मोठा पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प, ज्यामुळे राजकारणापलीकडेही त्यांची विश्वासार्हता वाढली.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठे वळण २०२१ मध्ये आले. केरळचे राजकारण असे आहे की दर पाच वर्षांनी सत्तांतर होणे ही एक प्रथाच बनली आहे. तथापि, २०२१ च्या निवडणुकीत डाव्या आघाडीने युडीएफचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला. या पराभवानंतर, काँग्रेस हायकमांडने ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांच्या जागी सतीशन यांची १५ व्या विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली.