धनखड यांचा राजीनामा, राज्यसभेच्या अध्यक्षपदाची सूत्रे आता कोणाकडे? नवा उपराष्ट्रपती कसे निवडणार?

Vice President Jagdeep Dhankhar Resign : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केलं की, वैद्यकीय सल्ल्यानुसार, प्रकृतीला प्राधान्य देत मी भारतीय संविधानाच्या कलम 67 (अ) नुसार उपराष्ट्रपती पदाचा (Rajya Sabha) तात्काळ राजीनामा देत आहे. धनखड यांचा राजीनामा म्हणजे देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या घटनात्मक पदावर नवा चेहरा लवकरच दिसणार आहे. आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की, या पदावर भाजपचा एखादा अनुभवी आणि वजनदार नेता विराजमान होऊ शकतो.
भारतीय संविधानानुसार, देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. ते सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे, उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर राज्यसभेचे (Jagdeep Dhankhar Resigns) सभापतीपद तात्पुरते रिक्त झाले आहे. या दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे आणि महत्त्वाची विधेयके, चर्चांचे प्रस्ताव आणि राजकीय घडामोडींचा ओघ वाढणार आहे.
महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; आज ५५ वा वाढदिवस, असा आहे देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास
अध्यक्षपदाची जबाबदारी कोण सांभाळणार?
संसदेच्या कार्यपद्धतीनुसार, जर सभापती अनुपस्थित असतील (किंवा पद रिक्त असेल), तर राज्यसभेचे उपसभापती कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतात. सध्या हे पद हरिवंश नारायण सिंह यांच्याकडे आहे. ते 2020 पासून उपसभापतीपदावर कार्यरत आहेत. त्यामुळे नवीन उपराष्ट्रपतींची निवड होईपर्यंत राज्यसभेचे कामकाज हरिवंश नारायण सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल.
उपराष्ट्रपती पदाचे महत्व काय?
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. ते राज्यसभेच्या कामकाजाचे संचालन करतात आणि अनेकदा तिथे गोंधळाची परिस्थिती असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवतात. याव्यतिरिक्त, जर राष्ट्रपती पद रिक्त झालं, तर तोपर्यंतची जबाबदारी उपराष्ट्रपतीकडे जाते. म्हणूनच, हे पद केवळ औपचारिक नसून, संवैधानिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे.
उपराष्ट्रपतीपदाची निवड प्रक्रिया कशी असते?
भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी थेट जनतेकडून मतदान होत नाही. ही निवडणूक खासदारांद्वारे होते. खाली दिलेल्या अटींनुसार उमेदवार निवडणूक लढवू शकतो:
– तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा
– त्याचं वय 35 वर्षांपेक्षा जास्त असावं
– राज्यसभेचा सदस्य व्हावा अशी पात्रता असावी
– अर्ज करताना 15 हजार रुपये डिपॉझिट भरावे लागतात
आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल? जाणून घ्या आजचे राशी भविष्य…
कोण मतदान करतात?
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मतदान करतात. यात लोकसभेचे 543 खासदार आणि राज्यसभेचे 245 खासदार यांचा समावेश असतो. राज्यसभेतील 12 नामनिर्देशित खासदारांनाही मतदानाचा अधिकार असतो. मात्र, या निवडणुकीत विधानसभांमधील आमदारांचा सहभाग नसतो. या निवडणुकीत प्राधान्यक्रमावर आधारित मतदान पद्धत वापरली जाते. मतदार आपल्या पसंतीनुसार उमेदवारांना क्रमांक देतात – जसे की पहिली पसंती (1), दुसरी पसंती (2), तिसरी पसंती (3) वगैरे. उदाहरणार्थ, तीन उमेदवार असतील – A, B आणि C – तर मतदार A ला 2, B ला 3 आणि C ला 1 असा क्रम देऊ शकतो. यात ज्याला सर्वाधिक ‘पहिली पसंती’ची मते मिळतात, त्याला प्राथमिक फायदा होतो.
मतमोजणी कशी केली जाते?
– विजयासाठी उमेदवाराला एक निश्चित किमान मते मिळवावी लागतात.
– उदाहरणार्थ, जर एकूण 720 खासदारांनी मतदान केलं, तर सर्वप्रथम ही संख्या 2 ने भागली जाते – म्हणजे 360. त्यानंतर त्यात 1 जोडला जातो – म्हणजे एकूण 361 मते मिळाल्यावर उमेदवार विजयी ठरतो.
– पहिल्या फेरीत केवळ पहिली पसंती असलेली मते मोजली जातात.
– जर कुणालाआवश्यक आकड्यापेक्षा जास्त मते मिळाली नाहीत, तर सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराला स्पर्धेतून वगळले जाते.
– त्यानंतर त्याच्या मतांमधील दुसरी पसंती असलेल्या मतांचा दुसऱ्या उमेदवारांना पुनर्वितरित केला जातो.
– ही प्रक्रिया जोपर्यंत कुणाला आवश्यक मते मिळत नाहीत, तोपर्यंत सुरू राहते.
नवीन उपराष्ट्रपती कोण होईल?
धनखड यांचा राजीनामा ही एक महत्त्वाची घटना आहे. आता निवडणूक आयोग लवकरच उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची घोषणा करेल. त्यानंतर उमेदवार अर्ज दाखल करतील, प्रचार होईल आणि खासदार मतदान करतील. भाजपकडे संसदेतील बहुमत असल्याने, त्यांच्या उमेदवाराचा विजय होण्याची शक्यता अधिक आहे. राजकीय चर्चांमध्ये अनेक नावं चर्चेत असतील, परंतु अंतिम निर्णय सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीवर आणि युतीच्या समीकरणांवर अवलंबून असेल.