अबब! 13 हजार रुपयांत फक्त एक लिंबू; खरेदीसाठीही गर्दीच गर्दी, काय घडलं?

Tami Nadu News : तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट खरी आहे. तामिळनाडूत एक लिंबाचा लिलाव चक्क 13 हजार रुपयांना झाला आहे. इरोड गावातील मंदिरात पूजेदरम्यान या लिंबाचा वापर करण्यात आला होता. यानंतर या लिंबाचा लिलाव करण्यात आला. या लिलावात एका खरेदीदाराने 13 हजार रुपये मोजून लिंबू खरेदी केले. याव्यतिरिक्त बोली लावणाऱ्या लोकांनी चांदीची अंगठी आणि चांदीच्या नाण्यांवरही बोली लावली. तामिळनाडूतील अनेक मंदिरांत पूजेत उपयोगात आणलेल्या वस्तुंचा लिलाव केला जातो. या वस्तू भाविक लोक जास्त पैसे खर्च करून विकत घेतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री विलक्केथी गावातील पजमथिन्नी करुप्पा ईश्वरन मंदिरात लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. या लिलावात लिंबू, चांदीची अंगठी आणि चांदीचे नाणे या वस्तू होत्या. थंगराज नावाच्या व्यक्तीने लिंबू 13 हजार रुपयांना खरेदी केले. तर अराचलूर येथील चिदंबरम यांनी 43 हजार 100 रुपयांना चांदीची अंगठी खरेदी केली.
केरळ अन् तामिळनाडूत कचऱ्याचा वाद; जाणून घ्या, बायोमेडिकल वेस्टची A टू Z माहिती..
मागील वर्षात विलुप्पुरम जिल्ह्यातही असाच लिलाव झाला होता. यावेळी लिलावातील लिंबांची तब्बल 2.36 लाख रुपयांना विक्री झाली होती. यातील एक लिंबू 50 हजार 500 रुपयांना विकले गेले होते. लिलावातून मिळणाऱ्या या पैशांचा उपयोग मंदिराची देखभाल आणि सामाजिक कार्यांसाठी केला जातो. या लिलावात भाविक मोठ्या संख्येने सहभाग घेतात. जास्तीचे पैसे मोजून वस्तू खरेदी करतात. तामिळनाडूत (Tamil Nadu) याकडे आस्था आणि परंपरेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.