Ahmednagar Politics : आमदार नीलेश लंकेंकडून लोकसभा लढविण्याचे संकेत

Ahmednagar Politics : आमदार नीलेश लंकेंकडून लोकसभा लढविण्याचे संकेत

पुणे : राजकारणामधील आपल्या मर्यादा मी ठरवून घेतल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा शब्द आपल्यासाठी प्रमाण आहे. आपण त्यांच्या शब्दापलीकडं जायचंच नाही, हीच आपल्या राजकारणाची भविष्यातील भूमिका असणार आहे. त्यांनी आदेश दिल्यास कोणी कितीही मोठा असला तरी आपण त्याच्याविरोधात आपण लढायला तयार आहोत, अशा शब्दांत आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे एक प्रकारे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. त्यानंतर हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठींचा असल्याचंही आमदार नीलेश लंके यांनी सांगितलंय. सालाबादप्रमाणं नीलेश लंके प्रतिष्ठानचा देहू (जि. पुणे) येथे कौटुंबिक स्नेह मेळावा पार पाडला. नीलेश लंके प्रतिष्ठानचा हा सहावा वर्धापन दिन आहे.

काही दिवसांपासून आमदार नीलेश लंके यांची लोकसभेसाठी तयारी सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. ते वाटण्यासाठी पोषक अशा घटनाही काही दिवसांपासून घडत असल्याचं दिसून आलंय. त्यातच आता खुद्द नीलेश लंके यांनी याची पुष्टी केली आहे.

नीलेश लंके प्रतिष्ठानच्या मेळाव्याला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासह पारनेर मतदार संघातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी नगर दक्षिण लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून नीलेश लंकेंनी निवडणूक लढवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्या सर्वांच्या म्हणण्याला आमदार नीलेश लंके यांनी असं उत्तर दिलंय. लंके यावेळी म्हणाले की, आमचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांनी आदेश दिला तर आपण कोणतीही निवडणूक लढवायला तयार आहे. पण, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा निर्णय हा शेवटी पक्षश्रेष्ठींचा असणार आहे, असंही यावेळी सांगितलंय.

नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक असल्याचे संकेत दिल्यानंतर नगर दक्षिणमधून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी तगडं आव्हान ठरु शकतात. पण लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके स्वतः उतरणार की त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके या उतरणार? हे त्यावेळीच पाहायला मिळेल.

लंके प्रतिष्ठाणच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानदेव लंके, नीलेश लंके प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, राजेंद्र चौधरी, सचिव ॲड. राहुल झावरे, दीपक लंके, नगराध्यक्ष विजय औटी, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, अशोक सावंत आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube