इंदापूर, दौंड अन् पुरंदरचे वाद… अजितदादांच्या मदतीला चंद्रकांतदादा सरसावले…

इंदापूर, दौंड अन् पुरंदरचे वाद… अजितदादांच्या मदतीला चंद्रकांतदादा सरसावले…

हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे, विजय शिवतारे विरुद्ध अजित पवार, राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात… बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्राताई पवार यांच्या विजयात अडसर ठरु शकणारे तीन वाद. म्हणजे यातील एका जरी गटाने अजितदादांची साथ देण्यास नकार दिला तर तो त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरु शकतो. तसे बघितले तर या तिन्ही वादांना कधीकाळी खत पाणी अजितदादांनीच घातले. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात दत्तामामांना ताकद अजितदादांनीच दिली. पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांना जाहीर सभेतून पाडण्याचे आव्हान अजितदादांनीच दिले होते. दौंडमध्ये कुल कुटुंबांचे वर्चस्व मोडित काढण्यासाठी थोरात यांनाही ताकद दिली ती अजित पवार यांनीच.

आता हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil), राहुल कुल (Rahul Kul) भाजपमध्ये (BJP) आहेत तर विजय शिवतारे (Vijay Shivtare) शिवसेनेत (Shivsena) आहेत. पण हे सगळेच एकत्रित महायुतीत असल्याने हे वाद अजितदादांसाठी चिंतेचे कारण ठरत आहेत. ही चिंता मिटवण्याची अजितदादा सत्तेच्या माध्यमातून, वैयक्तिक पातळीवर जे शक्य आहेत ते सगळे प्रयत्न करत आहेत. मात्र यंदा कोणत्याही परिस्थितीत सुनेत्रा ताईंना विजयी करायचेच अन् बारामती शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घ्यायचीच असा चंग भाजपने बांधला आहे. त्यामुळे हे वाद मिटविण्यासाठी अजितदादांसोबतच भाजपनेही पुढाकार घेतला आहे. भाजपच्या वतीने वाद मिटविण्याची आणि अजितदादांच्या मदतीसाठी चंद्रकांत पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तीन तालुक्यांमधील हे वाद मिटल्यास सुनेत्राताईंना आगामी लोकसभा अत्यंत सोपी ठरु शकते.

याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पाहुया या तीन तालुक्यांमधील हे वाद नेमके काय आहेत आणि ते मिटविण्यासाठी अजितदादा-भाजपचे कसे प्रयत्न सुरु आहेत.

हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार

आधी शरद पवार विरुद्ध शंकरराव पाटील आणि आता हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील वाद हा पुणे जिल्ह्याला नवीन नाही. 1994 मध्ये जिल्हा परिषदेला आणि 1995,1999 मध्ये विधानसभेला हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेसने तिकीट नाकारले. त्यांनी अपक्ष उडी घेतली आणि विजयी झाले. मात्र या तिन्हीवेळी पवार-काका पुतण्याच्या दबावामुळेच आपल्याला तिकीट नाकारले असे आरोप त्यांनी केले. 1999 मध्ये निवडून आल्यानंतर पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागली. पण त्यांच्या मंत्रिपदाला अजितदादांचा तीव्र विरोध होता. राष्ट्रवादीने अगदी विलासराव देशमुख यांचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली. त्यातून पाटील यांचा राजीनामा घेण्यात आला.

2009 च्या निवडणुकीपूर्वी विलासरावांनी हर्षवर्धन पाटलांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणले. पाटलांनी लोकसभेला सुप्रिया सुळेंचे काम केले. त्या बदल्यात विधानसभेला अजितदादांनी आपले काम करावे अशी हर्षवर्धन पाटलांना अपेक्षा होती. पण त्या निवडणुकीत अजितदादांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या दत्तामामा भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात रिंगणात उडी घेतली. त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांनीही भरणेंना पाठिंबा दिल्याची चर्चा होती. पण पाटलांचा आठ हजार मतांनी विजय झाला. 2014 साली पाटील यांनी पुन्हा एकदा सुळेंना मदत केली. मात्र विधानसभेला युती तुटली आणि दत्तामामा भरणेंना राष्ट्रवादीकडून अधिकृत तिकीट मिळाले. त्यावेळी हर्षवर्धन पाटलांचा 14 हजार मतांनी पराभव झाला.

लोकसभेसाठी BJP चं कौटुंबिक कार्ड; मी चौकीदार नंतर, मी मोदींचं कुटुंब’; नेत्यांनी बदललं ‘X’ बायो

2019 च्या लोकसभेला पुन्हा पाटील यांनी सुळेंना मदत केली. बदल्यात विधानसभेची जागा काँग्रेसला सोडायची अशी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादीने इंदापूर सोडण्यास नकार दिला. हर्षवर्धन पाटलांनी भाजपची वाट धरली. पुन्हा दत्तामामा निवडून आले. आता हर्षवर्धन पाटील यांनी आधी विधानसभेचा शब्द द्या म्हणून अजितदादांपुढे अट टाकली आहे. त्याचवेळी पाटील यांनी आपल्याला राष्ट्रवादीकडून धमक्या येत असल्याचा आरोप केला आहे. पण दत्ता भरणे यांच्या रुपाने इंदापूरची हक्काची असलेली जागा कशी सोडायची असा पेच त्यांच्यापुढे आहे. त्यातून आता हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. अजितदादांनीही हर्षवर्धन पाटील यांच्या दोन्ही साखर कारखान्यांना कर्जाची थकहमी म्हणून जवळपास 225 कोटी रुपये देऊ केले आहेत.

राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात :

4 जुलै 2001 रोजी तीन टर्मचे आमदार आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले सुभाष कुल यांचे पदावर असतानाच निधन झाले. त्यानंतर तिथे पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यात रंजना कुल विजयी झाल्या. पण याच घटनेनंतर दौंडच्या राजकारणात कुल आणि थोरात असे एकाच पक्षात दोन गट तयार झाले. 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून रंजना कुल निवडणूक रिंगणात होत्या; त्यावेळी जिल्हा बँकेचे संचालक असलेले रमेश थोरात यांनी अपक्ष रिंगणात उडी घेतली. थोरात हे 1985 पासून जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे थोरात यांना त्यावेळीही अजितदादांचा आशीर्वाद आहे अशी चर्चा रंगली. पण त्या निवडणुकीत रंजना कुल 24 हजार मतांनी विजयी झाल्या.

2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा राहुल कुल यांना उमेदवारी दिली. पुन्हा एकदा अपक्ष म्हणून रमेश थोरात उभे राहिले. यावेळी मात्र थोरात यांनी 17 हजार मतांनी बाजी मारली. या सगळ्याला वैतागून 2014 ची लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेत रासपचा झेंडा हाती घेतला. तर थोरात यांना राष्ट्रवादीकडून अधिकृत तिकीट मिळाले. दौंडमधील निर्णायक धनगर मते आणि भाजपचा पाठिंबा या बळावर कुल यांनी थोरात यांचा 11 हजार मतांनी पराभव केला. 2019 मध्ये कुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये पुन्हा रमेश थोरात विरुद्ध राहुल कुल यांच्यात लढत रंगली. लढत अत्यंत अतितटीची झाली. रासप सोडल्याचा परिणाम, कुल यांच्यावरील कारखान्यातील भ्रष्टाचाराचे आरोप या सगळ्याचा निकालावर परिणाम बघायला मिळाला. कुल यांचा 673 मतांनी निसटता विजय झाला.

कोल्हेंना खासदार करणे ही आमचीच चूक; सेलिब्रेटी उमेदवारांवरून शिरूरमध्ये अजितदादांची जोरदार बॅटिंग!

आता राहुल कुल भाजपमध्ये तर रमेश थोरात अजितदादांसोबत आहेत. दोघेही महायुतीत असल्याने सुनेत्रा पवार यांच्यासाठी काम करावे लागणार आहे. गतवेळी सुप्रिया सुळे यांना दौंडमध्ये आघाडी मिळाली नव्हती. आता सुनेत्रा पवार यांच्यासाठी दौंडमध्ये आघाडी मिळविणे हे आव्हान असणार आहे. याचसाठी कुल आणि थोरात या दोन्ही गटांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे, हे अजित पवारही जाणतात. त्याचमुळे अजित पवार यांनी दोघांमधील वाद मिटविण्यासाठी कंबर कसली आहे.

विजयबापू शिवतारे विरुद्ध अजित पवार :

या दोघांमधील वाद हा तसा अलिकडील. 2008 पर्यंत शिवतारे राष्ट्रवादीमध्येच होते. मात्र 2009 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी छगन भुजबळ यांच्या आग्रहामुळे पुरंदरमधून सिटिंग आमदार असलेल्या अशोक टेकवडेंना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने दिगंबर दुर्गाडे या ओबीसी चेहऱ्याला संधी दिली. त्यामुळे दुखावलेल्या टेकवडे गटाने दुर्गाडेंचे काम करणार नाही, अशी भूमिका घेतली. तर संजय जगताप यांच्या बंडखोरीने मतविभागणी झाली. पुरंदर तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. शिवतारे यांनी हा प्रश्न निवडणुकीचा प्रमुख मुद्दा केला आणि शिवसेनेकडून पहिल्याच फटक्यात निवडून आले. मतदारसंघ हातून गेल्याने अजितदादा चांगलेच दुखावले गेले.

आमदार झाल्यानंतर शिवतारे यांनी पवार यांच्यावर पुरंदरच्या पाण्याचे आरोप करण्यास सुरुवात केली. पवारांनी बारामतीचे पाणी पळवल्याचा आरोप केला. तसेच गुंजवणी प्रकल्प, पुरंदर उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण, कॅनेल मधून शेतकऱ्यांना पाणी आदी योजना मतदार संघात आणल्या. 2014 च्या निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फुटीचा परिणाम आणि पवार यांच्यावर अत्यंत जहाल आरोप करत शिवतारे दुसऱ्यांदा निवडून आले. या निवडणुकीवेळी शिवतारे यांनी अजितदादांचा एका वादग्रस्त वक्तव्याचा हवाला देत त्यांना बारामतीचा टग्या ही उपमा दिली. तेव्हापासून अजितदादा आणि शिवतारेंमध्ये वैयक्तिक वैर सुरु झाले.

शिवतारे फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री झाले आणि साताऱ्याचे पालकमंत्रीही झाले. सातारा हा देखील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. तिथे शिवतारे राष्ट्रवादीची गळचेपी करत असल्याचे, निधीत डावलत असल्याचे आरोप होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शिवतारे-अजितदादा वाद टोकाचा बनला. शिवतारे यांनी एका प्रचार सभेत शरद पवार यांच्यावर एक वादग्रस्त टीका केली. ती टीका अजितदादांना चांगलीच लागली. त्यावेळी अजित पवार यांनी बारामती येथे विजय शिवतारे यंदा आमदार कसा होतो ते मी पहातोच, असे म्हणत त्यांना जाहीर इशारा दिला, आव्हान दिले. तो इशारा निकालात खरा ठरला आणि त्यावर्षी काँग्रेसच्या संजय जगताप यांनी 30 हजार मतांनी शिवतारे यांचा पराभव केला.

आता शिवतारे शिंदेंसोबत शिवसेनेत आहेत. आता त्यांनीही लोकसभेत मदत पाहिजे असली तर आधी विधानसभेचा शब्द द्या, अशी मागणी केली आहे. ज्या शिवतारेंना चॅलेंज देऊन पाडले त्यांनाच विजयी करण्साठी प्रयत्न कसे करायचे, हा प्रश्न अजितदादांपुढे असणार आहे. पण सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी अजितदादांना हा वाद मिटविणेही गरजेचे बनले आहे. अजितदादांना हे तिन्ही वाद मिटविण्यासाठी भाजपने चंद्रकांत पाटील यांना मदत करण्याची जबाबदारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे, विजय शिवतारे, रमेश थोरात, राहुल कुल यांना मुंबईत बोलावून घेतले होते. तालुका स्तरावर समन्वय ठेवा, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम अशा सुचना चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत दिल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube