Shirur Loksabha : अमोल कोल्हेंचा पराभव करण्यासाठी अजित पवारांचा शिलेदार ठरला…

  • Written By: Published:
Shirur Loksabha : अमोल कोल्हेंचा पराभव करण्यासाठी अजित पवारांचा शिलेदार ठरला…

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे राजकारण रोखठोक असते. जे हवे ते जाहीरपणे सांगतात आणि तसे मिळवूनही दाखवतात. लोकसभा निवडणुकीसाठीचे महायुतीतील जागावाटप ठरायच्या आधीच त्यांनी आपले मत स्पष्टपणे सांगितले. बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा हे चार लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असतील, असे त्यांनी जाहीरही करून दाखवले. याशिवाय भाजप आणि शिवसेनेकडून आणखी मतदारसंघ मिळविणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

या चारपैकी रायगडमध्ये अजितदादांचा उमेदवार ठरलेला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे हेच तेथून उमेदवार असतील, हे स्पष्ट आहे. इतर तीन ठिकाणचे खासदार हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे या तीन ठिकाणी अजितदादांना नव्याने उमेदवार शोधावे लागणार आहेत. त्यात त्यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना तगडा पर्याय देणार आणि तो निवडूनही आणणार, असा दावा केला आहे.

दादा खरोखर मोठे नेते, ते माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आव्हान देणार नाहीत : कोल्हे डिफेन्सिव्ह भूमिकेत

 

अजित पवार यांच्या या दाव्यानंतर शिरूरमध्ये त्यांचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता राहिली आहे. यासाठीची संभाव्य नावे या ठिकाणी आपण पाहू.

शिवाजीराव आढळराव पाटील –

हे तीन वेळा शिवसेनेकडून खासदार होते.  शिरूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना आढळराव येथे टिकून होते. २०१९ मध्ये शिरूरमधून पराभव झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ धरली. त्याला कारणही तसेच होते. शिवसेनेकडील मतदारसंघ हे एकनाथ शिंदे यांच्याकडे येतील, अशी त्यांना अपेक्षा होती. त्यामुळे साहजिकच आपणच भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार असणार असल्याचा त्यांचा विश्वास होता. मात्र महायुतीत अजित पवारांची एंट्री झाल्यानंतर आढळराव यांची समीकरणे थोडीशी डळमळीत झाली आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर मग आढळराव हे शिवसेना सोडून तिकडे जातील, अशी शंका व्यक्त होत आहे. तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र त्याला होकार किंवा नकार आढळराव गटाकडून आला नाही.  अजितदादांसाठी आढळराव हे चांगला पर्याय असू शकतील.

पार्थ पवार –

अजितदादांचे पुत्र असलेल्या पार्थ यांना राजकारणात स्थिर व्हायचे आहे. मावळमध्ये गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते मतदारसंघ शोधत आहेत. शिरूर हा त्यांच्यासाठी योग्य मतदारसंघ राहील, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते. त्यामुळे ऐनवेळी त्यांचे नाव आघाडीवर येऊ शकते. या मतदारसंघातील एकूण सहापैकी राष्ट्रवादीचे पाच तर भाजपचा एक आमदार आहे. राष्ट्रवादीचे चार आमदार हे अजित पवार यांच्यासोब आहेत. राष्ट्रवादीचे पाचवे आमदार आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. पण ते पार्थ यांच्या उमेदवारीला ते थेट विरोध करतील असे चित्र नाही. पार्थ यांच्यासाठी मावळपेक्षा अधिक सुरक्षित मतदारसंघ हा शिरूर असू शकतो. अर्थात त्यांनी त्या दृष्टीने अद्याप तयारी सुरू केलेली नाही.

काळजीच करु नका, शिरुरमध्ये पर्याय देणार अन् निवडूनही आणणार : अजितदादांचा कोल्हेंविरोधात शड्डू

पूर्वा वळसे पाटील –

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या म्हणून पूर्वा यांची ओळख आहे. त्या आंबेगाव विधानसभा किंवा शिरूर लोकसभेच्या उमेदवार राहणार असल्याची चर्चा अधूनमधून होत असते. यंदा तीन पक्ष एकत्र असल्याने वळसे पाटील हे आपल्या लेकीसाठी खासदारकीची संधी साधू शकतात. त्या आंबेगावातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतात. तेव्हा त्याचा अर्थ त्या राजकारणात येणार असा घेतला जातो. पण त्यांनीही गंभीरपणे अद्याप तयारीला सुरवात केलेली नाही. पण राष्ट्रवादी सोबत आता भाजप आणि शिवसेना यांची ताकद आली आहे. या आधी खुद्द दिलीप वळसे यांनी लोकसभेसाठी तयारी करावी, असा शरद पवारांचा आग्रह होता. पण विजयाची खात्री नसल्याने वळसे पाटलांनी तो कधी मान्य केला नाही. आता समीकरणे बदलल्याने वळसे पाटील हे धोका घेऊ शकतात.

विलास लांडे –

भोसरीचे माजी आमदार असलेले लांडे यांची खासदार होण्याची २००९ पासून इच्छा आहे. मात्र ती फलद्रूप होत नाही. त्यांना २००९ मध्ये या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. त्याचे उट्टे त्यांना काढायचे आहेत. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचा दावा केला. त्यानंतर लगेचेच लांडे यांनी स्वतःहून आपण या निवडणुकीसाठी तयार असल्याचे सांगितले. पण पक्ष नव्या चेहऱ्यांचा विचार करण्याची अधिक शक्यता दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube