“दादा खरोखर मोठे नेते, ते माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आव्हान देणार नाहीत” : कोल्हे डिफेन्सिव्ह भूमिकेत
पुणे : “तुम्ही काळजीच करु नका, शिरुरमध्ये पर्याय देणार अन् निवडूनही आणणार, असा निर्धार व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. मात्र “दादा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आव्हान देणार नाहीत, ते खरोखर मोठे नेते आहेत. त्यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देण्याइतका मोठा नेता नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे, असे म्हणत कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री पवार (Ajit Pawar) यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणे टाळत बचावात्मक पवित्रा घेतला. ते टीव्ही-9 मराठीशी बोलत होते. (NCP (Sharad Pawar) faction MP Amol Kolhe took a defensive stance, avoiding to respond to Deputy Chief Minister Ajit Pawar’s criticism)
अमोल कोल्हे म्हणाले, पदयात्रा आता सुचण्याचा विषय नाही. आता जी पदयात्रा आहे ती शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आहे. कांद्याच्या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये किती मोठा आक्रोश आहे, शेतकऱ्यांचे किती नुकसान होते याची कल्पना दादांनाही आहे. त्यामुळे जर हा विषय घेऊन पुढे जात असू, शेतकऱ्यांचे म्हणणे मांडत असू तर उलट त्यांनी आमच्या पदयात्रेला पाठिंबा द्यायला हवा. ते सरकारमध्ये आहेत, त्यांनी केंद्र सरकारशी बोलून या विषयावर तोडगा काढायला हवा. आमच्या सुरात सूर मिसळून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहायला हवे.
काळजीच करु नका, शिरुरमध्ये पर्याय देणार अन् निवडूनही आणणार : अजितदादांचा कोल्हेंविरोधात शड्डू
राहिला प्रश्न निवडणुकीचा, तर “दादा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आव्हान देणार नाहीत, ते खरोखर मोठे नेते आहेत. त्यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देण्याइतका मोठा नेता नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे. निवडणुकीबाबत बोलायचे तर आता मी शिरुरचे प्रतिनिधीत्व करत आहे. निवडणूक हे एकमेकांना आव्हान देऊन लढण्याची गोष्ट नाही. इथे प्रश्न मांडण्याची गोष्ट आहे. निवडणूक लढणार की नाही याबाबतचा पूर्ण निर्णय पक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेतील असेही खासदार कोल्हे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
खाजगीत बोलले खाजगीत राहु द्या :
अमोल कोल्हे यांनी खाजगीत बोलताना राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. यावर कोल्हे म्हणाले, “मला वाटतं विश्वासाने खासगीत सांगण्याच्या काही गोष्टी असतात, त्या खासगीत ठेवण्याचा संकेत असतो. मला वाटते हा संकेत माझ्याकडून तरी किमान पाळला जावा. त्यामुळे माझे असे काही बोलणे झाले असेल, तर ते खासगीतच राहावे”.
अजित पवार काय म्हणाले?
खासदार कोल्हे हे 27 ते 30 डिसेंबर या दरम्यान किल्ले शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहे. याबद्दल आज (25 डिसेंबर) पुणे दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली.
अजित पवार म्हणाले, “शिरुर मतदारसंघातील विद्यमान खासदाराने पाच वर्ष त्याच्या मतदारसंघात लक्ष दिले असते तर बरे झाले असते. दीड वर्षापूर्वी तो खासदार मला राजीनामा द्यायचा आहे, म्हणत माझ्याकडे आला होता. पण त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जीवाचे रान केले होते. त्यांना आणि मला खासगीत बसवा. आता त्यांचे सगळे चाललेले आहे. पण मधल्या काळात ते सहाही विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यांनी मला आणि त्यावेळेसच्या वरिष्ठांना सांगितले होते की, मी राजीनामा देत आहे, मी कलावंत आहे. माझ्या सिनेमावर परिणाम होत आहे. माझा सिनेमा चालला नाही.
कुबड्यांवर चालणाऱ्या पक्षाने 45 जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा; सर्व्हेनंतर राऊतांचा विश्वास दृढ
“पण आता निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे यांना उत्साह आला आहे. त्यातून कोणाला संघर्षयात्रा सुचते तर कोणाला पदयात्रा सुचते. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला भूमिका मांडायचा अधिकार आहे. त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्यपद्धतीने दिली होती. परंतु दोन वर्षातच ते ढेपाळले आणि राजीनामा द्यायला लागले होते. एकंदरीत चित्र बघून आम्ही उमेदवारी देत असतो, पण आता तुम्ही काळजी करु नका. शिरुरमध्ये पर्याय देणारच आणि तिथे दिलेला उमेदवार निवडणूनही आणणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.