तुम्ही लढा, चांगल्या दिवसांत आम्ही.., दादांकडून वडेट्टीवारांचं अभिनंदन पण थोरात-चव्हाणांना टोले
Ajit Pawar : अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या सुमारे ४० आमदारांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. त्यापूर्वी अजित पवार हे विरोधी पक्षनेते होते. मात्र, आता ते सत्तेत सहभागी झाल्यानं विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. दरम्यान, या जागेवर आता मविआच्या वतीने कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या अभिनंदाचा ठराव आज विधानसभेत मांडण्यात आला. तेव्हा अजित पवारांनी वडेट्टीवारांचं कौतुक केलं. तर अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातांवर मिश्किल टोलेबाजी केली. (Ajit Pawar on ashok chavhan and balasaheb thorat over vijay vadettiwar)
वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागल्यानंतर अभिनंदनाचा प्रस्ताव आणण्यात आला. तेव्हा अजित पवारांनी बोलतांना सांगितलं की, विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कॉंग्रसचे विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्याबद्दल मी व्यक्तीश, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आणि सत्ताधारी महायुतीच्यावतीने त्यांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद हे एक मानाचं पद आहे. मुख्यमंत्र्याकडून जशा जनतेच्या अपेक्षा असतात. तसा विरोधी पक्षनेत्याकडूनही असतात. कारण, मुख्यमंत्र्यांकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करून घेण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेत्याची असते. मला विश्वास आहे तुम्ही चांगलं काम कराल आणि जनेतचा विश्वास सार्थ ठरवाल, असं अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा तुम्हाला अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना ज्या प्रकारची खाती मिळाली होती, तसं एखादं खातं तुम्हाला मिळेल, असं वाटलं होतं. पण नाही मिळालं. आता अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा अनुभव असल्यानं ते विरोधी पक्षनेते होतील, असं वाटलं होतं. किंवा बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते होतील, असं वाटलं. पण या दोघांनीही विरोधी पक्षनेतेपद घेतलं नाही. हे म्हणजे, जे लढायचं, ते तुम्ही लढा. नंतर पुन्हा चांगले दिवस आल्यानंतर आम्ही आहोतच, असा काहींचा स्वभाव असतो, असं टोलाही त्यांनी चव्हाण-थोरातांना लगावला.
ते म्हणाले, तुम्ही जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हा विदर्भात शिवसेनेचे अस्तित्व नव्हते. पण तुम्ही चंद्रपूर, चिमूर, ब्रम्हपुरी अशा ठिकाणी शिवसेना वाढवण्याचे काम केले. यात तुमच्या वरिष्ठांनीही मार्गदर्शन केले. मात्र तुमची सर्व कामे पाहून तुम्हाला 1998 मध्ये विधान परिषद सदस्यपद मिळाले. त्यानंतर आज तुम्ही विधानसभेचे विरोधी पक्षनेते झालेत. तुमची विधीमंडळात 25 वर्षांची राजकीय कारकीर्द आहे. तुमची कारकीर्द अशीच चालू राहील. कारण तुम्ही शिवसेना असो वा काँग्रेस, तुम्ही तुमची राजकीय भूमिका सोडलेली नाही.
आमच्या भागात मतदारसंघ बदलणे खूप अवघड आहे, मी बारामतीत पहिल्या क्रमांकाने निवडून येईल. पण शेजारच्या मतदारसंघात उभे राहण्याचे धाडस आम्ही दाखवू शकत नाही. पण तुम्ही संगमनेरमध्येही उभे राहून मोठ्या फरकाने निवडून येऊ शकता. आम्ही दुसऱ्या मतदारसंघात जाण्यापूर्वी दहा वेळा विचार करतो. पण तुम्ही मात्र, चिमूरला निवडून आलात. ब्रम्हपुरीला दोन वेळा चांगल्याप्रकारे निवडून आलात. अर्थात तुमचे काम चांगले आहे. तुमचा जनसंपर्क चांगला आहे, त्यामुळेच तुम्ही हे सर्व करू शकलात’ असेही अजित पवार म्हणाले.