लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! बबनराव घोलपांचा शिंदे गटात प्रवेश
Babanrao Gholap Join shivsena : लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap ) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. सीएम शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! बबनराव घोलपांचा शिंदे गटात प्रवेश
बबनराव घोलप हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकूडन इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशामुळे शिर्डीची जागा ही ठाकरे गटाने महाविकास आघाडीकडून लढवावी अशी भूमिका घेण्यात आली होती. दरम्यान, ठाकरे गटाने वाकचौरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळं घोलप नाराज झाले होते. दरम्यान, गेल्या फेब्रुवारीत त्यांनी उपनेते पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला.
ठाकरे गटाकडून माझ्यावर अन्याय…
यावेळी बोलतांना घोलप म्हणाले की, आज माझा शिवसेनेत प्रवेश होतोय. मी 54 वर्षापासून शिवेसेनेत काम करतोय. बाळासाहेबांचा निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक म्हणून मी आजवर सेनेत वावरत आलो. दिलेली जबाबदारी पार पाडत आलो. मात्र,उबाठाने माझ्यावर अन्याय केला. माझ्याकडील जबाबदाऱ्या काढून घेतल्या. त्यामुळं मी माझ्या उपनेते पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावर माझी उद्धव ठाकरेंकडून काहीतरी विचारणा होईल, असं वाटलं. मात्र, माझी कुणाकडूनही विचारणा झाली नाही. त्यामुळं ठाकरे गटाला माझी गरज उरली नाही,असं वाटल्यांनं मी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याचं घोलप म्हणाले.
ते म्हणाले, शिंदे साहेबांचं काम गोरगरीब जनेतला भावलेलं आहे. माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची माहिती आहे. मी अनेक वर्ष आमदार होता. शिंदेंनी माझ्यावर कोणताही जबाबदारी दिली, तर मी त्या जबाबदारीला न्याय देईल असंही घोलप म्हणाले.
आम्हालाही तोच अनुभव – सीएम शिंदे
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. बबनराव घोलप आमच्यासोबत आले. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी भगवा खांद्यावर घेतला आहे. त्यांना तिथे जो अनुभव आला, तोच अनुभव आम्हालाही आला आहे, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. यावेळी सीएम शिंदेंनी बबनराव, तुम्हाला चर्मकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करायचे आहे, असं सांगितलं.