बबनदादा, संजयमामा, कल्याणराव अन् परिचारक फडणवीसांच्या बंगल्यावर : मोहिते पाटील चेकमेट होणार?

बबनदादा, संजयमामा, कल्याणराव अन् परिचारक फडणवीसांच्या बंगल्यावर : मोहिते पाटील चेकमेट होणार?

माढा : माढ्यातून मोहिते पाटील घराणे भाजपची साथ सोडणार आणि धैर्यशिल मोहिते पाटील (Dhairysheel Mohite Patil) तुतारी हाती घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे. गुढीपाडव्यानंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात पक्षप्रवेश होणार आहे. याच पार्श्वभूमीवर माढ्याची जागा भाजपकडे (BJP) कायम राखण्यासाठी आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांचा विजय निश्चित करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी सागर बंगल्यावर एक खास बैठक घेतली. (Devendra Fadnavis held a special meeting at Sagar Bungalow to determine the victory of Ranjitsinh Naik Nimbalkar in Madha.)

या बैठकीला माढ्याचे भाजप खासदार आणि लोकसभेचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे, त्यांचा मुलगा रणजीत शिंदे, विधान परिषदेचे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे, माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते. माढ्यात मोहिते पाटील घराण्याला चेकमेट करण्यासाठी काय करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

Lok Sabha Election: मंगलदास बांदल यांची उमेदवारी वंचितकडून रद्द, फडणवीसांना भेटणे नडले !

बैठकीत नेमके काय झाले?

माढा आणि करमाळा या बांधाला बांध असलेल्या मतदारसंघात बबनदादा शिंदे आणि संजयमामा शिंदे या बंधुंचे वर्चस्व आहे. बबनदादांनी माढ्यातून सलग सहाव्यांदा बाजी मारली आहे. पण या शिंदे बंधुंचे आणि मोहिते पाटलांचे सख्य नाही. अशात लोकसभेनंतर विधानसभेलाही मोहिते पाटलांशी यांची गाठ पडणार आहे. त्यामुळे रणजीतसिंहांना आताच जास्तीत जास्त लीड देऊन लोकसभेलाच मोहिते पाटलांच्या आत्मविश्वासावर घाव घालायचा, असे नियोजन या बैठकीत ठरले असल्याचे सांगितले जाते. माढा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावे येतात. या तालुक्यात प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांनाही मताधिक्याबाबत सूचना देण्यात आल्याचे समजते.

जे रामराजे रणजीतसिंहांना विरोध करतात त्याच रामराजेंच्या फलटणमधून गत निवडणुकीत रणजीतसिंहांना 13 हजारांचे मताधिक्य मिळविले होते. तर माण-खटावमधून 23 हजारांचे मताधिक्य होते. हेच मताधिक्य कायम ठेवण्यासाठी काय काय करता येईल याबाबत आमदार जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा झाली. या दोन्ही मतदारसंघांमधून मोठी आघाडी मिळाली तर रामराजेंच्या विस्ताराला आताच ब्रेक लागू शकतो, असा या सर्व नेत्यांचा दावा होता. इतर मतदारसंघांबाबत म्हणजे, सांगोला मतदारसंघात खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाण्याच्या मोठ्या योजना मार्गी लावल्या आहेत. त्यामुळे सांगोल्यातूनही आघाडी घेण्याचा प्रयत्न होणार आहे.

Nana Patole : विरोधकांना भ्रष्ट ठरवण्याचं षडयंत्र फडणवीसांचं, सोमय्यांनी त्यांच्या खूनशी राजकारणाचा बुरखा फाडला

स्वतः रणजीतसिंह यांनी मागच्या वर्षभरामध्ये मतदारसंघांत कमालीच्या जोडण्या लावल्या आहेत. जे नारायण पाटील आणि जयवंतराव जगताप मोहिते पाटलांच्या जवळचे समजले जायचे तेही आता रणजीतसिंहांच्या बाजूने उभे आहेत. बागल घराणे हेही रणजीतसिंहांसोबत आहेत. उत्तमराव जानकर जे 2019 मध्ये विधानसभेला राष्ट्रवादीतून उभे होते ते देखील आता अजितदादांसोबत असून ते भाजपच्या वाटेवर आहेत. हे सर्व जण मोहिते पाटील नको म्हणून रणजीतसिंहांसोबत आहेत. थोडक्यात संजय शिंदे, बबन शिंदे, शहाजीबापू पाटील, राम सातपुते आणि जयकुमार गोरे या पाच आमदारांची आणि नारायण पाटील, बागल या माजी आमदारांची ताकद रणजीतसिंहांच्या मागे उभी करण्याबाबत कशापद्धतीने पुढे जाता येईल याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

मोहिते पाटील अन् रामराजेंचे बंड :

मोहिते पाटील कुटुंबिय हे सध्या भाजपमध्ये आहे. रणजीतसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार देखील आहेत. तर रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. माढ्यातून उमेदवारीसाठी धैर्यशिल मोहिते पाटील हे भाजपकडून इच्छुक होते. तर रामराजे नाईक निंबाळकर यांचा भाजपचे माढ्याचे विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र भाजपने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची माढ्यातून उमेदवारी घोषित केली. तेव्हापासूनच मोहिते पाटील घराणे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोध करत बंडाचे संकेत देण्यास सुरुवात केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज