पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीत काय घडलं?, खासदार बजरंग सोनवणेंनी कोणत्या मागण्या केल्या?
मुख्यमंत्री यांनी मदत देण्याचे आश्वासन दिले असतानाही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. जवळपास अर्धा तास झालेल्या या बैठकीत खासदारांनी आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडले.
या भेटीदरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. पावसाळ्याचे अडीच महिने उलटूनही अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने नद्या कोरड्या पडल्या आहेत. गोदावरीचा अपवाद वगळता बहुतांश नद्यांना अद्याप पाणी आलेले नाही. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसंच, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अडचणीत आला असून, या संकटाच्या काळात केंद्र सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी सोनवणे यांनी पंतप्रधान मोदींकडे केली.
सन 2025-26 मधील पीक विम्याची रक्कम आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही, याकडेही त्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री यांनी मदत देण्याचे आश्वासन दिले असतानाही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर थकीत पीक विम्याची रक्कम आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी आग्रही मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी पंतप्रधानांकडे केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांच्या प्रलंबित दाव्यांचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत मांडला. सन २०२५–२६ मधील प्रलंबित पीक विमा दाव्यांची रक्कम तातडीने अदा करावी आणि २०२६–२७ पासून अॅड-ऑन कव्हर पुन्हा लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी व फिरत्या शाळांची व्यवस्था, स्थानिक रोजगाराच्या संधी, कृषी आधारित उद्योग, अन्न प्रक्रिया, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि कौशल्य विकासाला चालना देण्याची मागणीही त्यांनी केली.
बीड जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेबाबतही सोनवणे यांनी विविध मागण्या मांडल्या. धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या कामाला गती देऊन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. बीडमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व सुपर स्पेशालिटी आरोग्य सुविधा उभाराव्यात, तसेच अंबाजोगाई येथे ५० खाटांचा क्रिटिकल केअर ब्लॉक मंजूर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. यासोबतच एफपीओ, शीतगृहे, गोदामे आणि कृषी प्रक्रिया सुविधांचा विस्तार करून बीडमधील धार्मिक व पर्यटनस्थळांचा केंद्रीय योजनांच्या माध्यमातून विकास करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष महायुती किंवा एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना खासदार बजरंग सोनवणे यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले. पक्ष शंभर टक्के विरोधी पक्षातच राहणार असून विरोधी पक्षाच्या बाकावरून जनतेचे प्रश्न मांडत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विमानप्रवासादरम्यान सत्ताधारी नेत्यांशी योगायोगाने झालेल्या भेटीगाठींचा राजकीय अर्थ काढणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. संसदेचे कामकाज ठप्प होण्यास सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप करत, सरकारने विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांशी संवाद साधून चर्चा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. इंडिया आघाडी आणि विरोधी पक्ष जो निर्णय घेईल, त्यासोबत आपला पक्ष पूर्ण ताकदीने उभा राहील, असेही सोनवणे यांनी स्पष्ट केले.
बजरंग सोनवणे यांच्या प्रमुख मागण्या
२०२५–२६ मधील प्रलंबित पीक विमा दाव्यांची रक्कम तातडीने अदा करावी.
२०२६–२७ पासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अॅड-ऑन कव्हर पुन्हा लागू करावे.
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी व फिरत्या शाळांची व्यवस्था करावी.
ऊसतोड कामगारांसाठी स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.
कृषी आधारित उद्योग, अन्न प्रक्रिया, एमएसएमई आणि कौशल्य विकासाला चालना द्यावी.
धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी.
प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा.
बीडमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व सुपर स्पेशालिटी आरोग्य सुविधा उपलब्ध कराव्यात.
अंबाजोगाई येथे ५० खाटांचा क्रिटिकल केअर ब्लॉक मंजूर करावा.
एफपीओ, शीतगृहे, गोदामे आणि कृषी प्रक्रिया सुविधांचा विस्तार करावा.
बीडमधील धार्मिक व पर्यटनस्थळांचा केंद्रीय योजनांच्या माध्यमातून विकास करावा.