भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठा गौप्यस्फोट; मोठे मासे वाचवण्यासाठी आर्थिक रॅकेट सक्रिय – रोहित पवार
अनेक बडे राजकारणी, अधिकारी आणि व्यावसायिक देखील अडकले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
Big revelation in Ashok Kharat case : नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवली असून, आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. महिलांचे लैंगिक शोषण, भक्तांच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा आणि आर्थिक फसवणूक या गंभीर आरोपांमध्ये अटक झालेला अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, या प्रकरणात केवळ खरातचं नाही तर अनेक बडे राजकारणी, अधिकारी आणि व्यावसायिक देखील अडकले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
नाशिकच्या मोरगाव परिसरात अशोक खरातने उभारलेल्या तथाकथित धार्मिक दरबारामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार आणि महिलांचे शोषण होत असल्याचा आरोप आहे. श्रीमंत भक्तांना आध्यात्मिक शक्ती, समस्या दूर करण्याचे आश्वासन आणि धार्मिक प्रभाव दाखवत लाखो रुपये उकळले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश खरातच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर विशेष पथकाकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अशोक खरात तुरुंगात आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप करत मोठा गौप्य्स्फोट केला आहे. त्यांच्या मते, अशोक खरात प्रकरणात अनेक मोठे राजकीय नेते, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक आणि प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असून अद्याप या प्रकरणातील एक टक्के सत्य देखील समोर आलेले नाही. सध्या जे काही समोर येत आहे ते फक्त छोटे मासे आहेत, अजून अनेक मोठे मासे या प्रकरणात अडकलेले आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
मान्सूनची आनंदवार्ता! अंदमानात वेळेआधी धडकण्याचे संकेत; महाराष्ट्राला उष्णतेतून लवकर दिलासा मिळणार?
याचबरोबर, या प्रकरणात नाव बाहेर येऊ नये किंवा तपासातून सुटका व्हावी यासाठी मोठे आर्थिक रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मोठमोठ्या रकमा घेऊन काही लोकांना या प्रकरणातून अलगद बाहेर काढले जात आहे. संबंधित व्यक्तींना भोंदूबाबाविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करायला सांगितले जाते आणि त्यानंतर त्यांची नावे बाजूला केली जातात, असा गंभीर दावा रोहित पवार यांनी केला आहे.
या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे. अशोक खरातच्या दरबारात राजकारणी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रशासनातील बडे चेहरे आणि उद्योगपती जात असल्याच्या चर्चा आधीपासूनच सुरू होत्या. मात्र आता थेट आर्थिक व्यवहार आणि तपासावर प्रभाव टाकण्याचे आरोप झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे.
दरम्यान, आपण केलेल्या आरोपांची आणि मिळालेल्या माहितीची सखोल चौकशी करून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे कोणती नवी नावे समोर येतात आणि तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.