‘मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासारखे घरकोंबडा बनून राहायचे का?’ भाजप आमदाराचा ठाकरेंना खोचक सवाल
Gopichand Padalkar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून (Eknath Shinde) विरोधकांनी त्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. दौऱ्यासाठी फक्त 10 लोकांना परवानगी असताना मुख्यमंत्री मात्र 50 लोकांना घेऊन जात आहेत. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिंदेच्या दौऱ्यावर टीका केली होती. त्यानंतर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) मुख्यमंत्र्यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासारखे घरकोंबडा बनून राहायचे का?, असा खोचक सवाल पडळकर यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
CM Shinde यांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्रात येणार, तीन लाख दहा हजार कोटी गुंतवणूक
आमदार पडळकर यांनी आज बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले. दावोस दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे जवळपास तीन लाख कोटींचे करार करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासारखे घरकोंबडा बनून घरात बसून राहायचे का? त्यांनी राज्यात काहीच काम करायचं नाही का? असे सवाल पडळकर यांनी उद्धव ठाकरेंना विचारले.
राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालावरही त्यांनी भाष्य केले. निकाल त्यांच्या बाजूने लागला असता तर कोर्ट चांगले ठरले असते. आता निकाल विरोधात गेला म्हणून टीका करणे योग्य नाही. जर ठाकरे गटाला निकाल पटला नसेल तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे. अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिल्याचे सांगच लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे योग्य नाही, तुम्ही चुकीचा पायंडा पाडत आहात अशी टीका पडळकर यांनी केली.
उद्योग विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालय असे दहा लोकांचे शिष्टमंडळ दौऱ्यावर जात आहे. एमएमआरडीए आणि महाप्रीन असे आठ लोक आहेत त्यांनाही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यांच्यासारखे (आदित्य ठाकरे) आकडे फुगवून कागदावर ठेवण्यासाठी आम्ही जात नाहीत. ते काय बोलतात यावर मी काही बोलण्याची गरज नाही. फक्त बोलघेवडेपणा करून राज्याच्या जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकता येणार नाही. जे करार आम्ही करू त्यांची निश्चित अंमलबजावणी होईल, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस दौऱ्यावर रवाना होण्याआधी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना दिले होते.