सर्वाधिक पेपरफुटी ठाकरेंच्या काळात; बॉडी बॅग घोटाळा, खिचडी घोटाळा…; फडणवीसांनी सगळचं काढलं
Devendra Fadnavis on Mahavikas Aghadi : महाराष्ट्र सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) गुरुवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी नेहमीप्रमाणे सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून जोरदार टीका केली. गुरुवारपासून सुरू होणारे अधिवेशन हे सरकारचं निरोपाचं अधिवेशन आहे, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) चांगलाच समाचार घेतला.
चहापानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना फडणीस म्हणाले की, अडीच वर्ष सत्तेत असलेल्या सरकारनं वैधानिक विकास मंडळ लॅप्स केलं. नवे सरकार आल्यानंतर आम्ही केंद्राशी बोलून ते नियमित केले. मराठवाडा वॉटर ग्रीड बंद पाडण्याचे काम महाविकास आघाडीने केले, अशी टीका फडणवीसांनी केली.
उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल….
पुढं बोलतांना फडणवीस म्हणाले, पेपरफुटीच्या संदर्भात आता हे विरोधक बोलत आहेत. पण सर्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली. बॉडी बॅग घोटाळा, कोविड घोटाळा, खिचडी घोटाळा हे सगळं कुणी केलं? प्रेतावरच्या टाळूवरचं लोणी खायचा प्रकार त्यावेळी यांनी सत्तेत असतांना केला. विरोधी पक्ष जे काही विसरला, ते आम्ही विसरलेलो नाही. आम्ही सर्व उत्तरे देऊ, असं फडणवीस म्हणाले.
खोटं नॅरेटीव्ह तयार करण्याची विरोधकांची फॅक्टरी
फडणवीस म्हणाले, गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली असं हे सांगत आहेत. पण, उद्धव ठाकरे विसरत आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र क्रमांक एकवर आला. वित्तीय केंद्र गुजरातला गेलं सांगत आहे. कधी गेलं? 2012 मध्ये गेलं. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? काँग्रेस आणि पंतप्रधानही काँग्रेसचेच होते. आता ते आज यावरून आम्हाला प्रश्न विचारत आहेत. खोटं नॅरेटीव्ह तयार करण्याची फॅक्टरी विरोधकांनी उघडली, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.