Chandrakant Patil : ‘कसबा विधानसभा भाजपचा बालेकिल्ला तो जिंकणारच’, चंद्रकांतदादांचा दावा

Chandrakant Patil : ‘कसबा विधानसभा भाजपचा बालेकिल्ला तो जिंकणारच’, चंद्रकांतदादांचा दावा

पुणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील ( Chandrakant Patil )  यांनी कसबा विधानसभा निवडणूक ( Kasaba Byelection )  जिंकणारच असा दावा केला आहे. यावेळी ते पुणे ( Pune ) येथे पत्रकारांशी बोलत होते. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपने नवीन कार्यालय उघडले आहे. त्या ठिकाणाहून निवडणुकीसंदर्भातील सर्व कामे चालतील, असे चंद्रकांतदादांनी सांगितले.  तसेच ही निवडणूक हरणार की जिंकणार हा प्रश्नच नाही, कसबा विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. फक्त किती मताधिक्याने जिंकणार हा प्रश्न आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.

या निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दोन्ही नेते येणार आहेत. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून हे दोन्ही नेते या प्रचारात सहभागी होतील. कारण आमचे सरकार हे जनतेच्या हिताचे सरकार आहे. गेली अडीच वर्षे विकासाची कामं न करता लोकांनी घरी राहून फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवले. काहीजण घरी बसले पण त्यांचे मंत्री भ्रष्टाचार करत राहिले, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील टोला लगावला. नाना आमच्याकडे ससे पण आहेत आणि कासव पण, तुमच्याकडे फक्त बोलघेवडे आहेत, असे ते नाना पटोलेंना म्हणाले आहेत. दरम्यान मेधा कुलकर्णी या प्रचारात दिसत नाहीत. त्या नाराज आहेत का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, कोणीही नाराज नाही. सगळेजण प्रचारात दिसतील. तसेच अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचं की नाही याचा उत्तर मी कसे देणार असे म्हणत त्यांनी अजितदादांना देखील चिमटा काढला. दरम्यान भाजपच्या कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणुक लागली आहे. भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे रिंगणात आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube