दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंच्या एका वक्तव्यानं खळबळ; शेतकऱ्यांचं आता पुढे काय होणार?
Chandrashekhar Bawankule : दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळण्याची चर्चा असतानाच, बावनकुळेंनी मदतीचा पेच वाढवला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या (Farmer) मदतीचा निर्णय नेमका कधी होणार, याकडे आता लक्ष लागलं आहे. सरकारनं दुष्काळग्रस्त भागासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना आजच्या आज मदत जाहीर केली जाणार नाही, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आणि त्याचा संपूर्ण अहवाल आल्यानंतरच मदतीचं स्वरूप ठरवलं जाईल, अशी सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं.
यवतमाळ दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना बावनकुळेंनी मदतीच्या प्रक्रियेबाबत सविस्तर भूमिका मांडली. कोणताही शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी अचूक पंचनामे होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तूर, कापूस, सोयाबीन, हळद, फळबागा आणि संत्री अशा वेगवेगळ्या पिकांचं नुकसान वेगवेगळं असल्यानं मदतीचे निकषही त्यानुसार ठरवावे लागतील, असं बावनकुळे म्हणाले. घाईनं मदत जाहीर केली आणि प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत मदत कमी पडली, तर शेतकऱ्यांचंच नुकसान होईल, त्यामुळे अंतिम अहवालाची प्रतीक्षा केली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, दुष्काळी नुकसानीचे पंचनामे अचूक असणं केंद्राकडून मिळणाऱ्या एनडीआरएफ मदतीसाठीही महत्वाचं असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर पंचनामे ग्रामसभेसमोरही मांडले जाणार आहेत. दुष्काळी परिस्थितीचा नियमित आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक दर आठवड्याला होणार असून प्रत्येक मंगळवारी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन शेतकरी आणि शेतमजुरांना मदत करण्याची गरज असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. सरकारच्या मदतीत शेतकऱ्यांचा पहिला हक्क असल्याचं स्पष्ट करत त्यांनी स्वतःचा दुष्काळी दौरा सुरू असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसा वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणला 12 तास वीज देण्याबाबत आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं. वीजपुरवठ्यात अडचणी आल्यास त्यावर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार यांनी दुष्काळाच्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याच्या मुद्द्यावरही बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला पत्र देणं ही त्यांची भूमिका असल्याचं सांगत, केवळ पवारांनी पत्र दिलं म्हणून सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. विविध पक्षांच्या आमदार आणि नेत्यांकडून दुष्काळाबाबत सरकारला 2000 पेक्षा जास्त पत्रं आल्याचा दावा त्यांनी केला. दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून काही भाग सुटला असेल, तर त्याचाही अभ्यास केला जाईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या एसआयआरविरोधातील भूमिकेवरही बावनकुळेंनी टीका केली. निवडणूक आयोगानं या प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण दिलं असून विरोधकांकडून केवळ शंका उपस्थित केल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीवेळी संविधान बदलण्याचा आरोप करून वातावरण निर्माण करण्यात आलं आणि आता एसआयआरचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचं ते म्हणाले. निवडणुकीत नकारात्मक वातावरण निर्माण करून फायदा मिळवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची टीका करत, देशात खोटेपणापेक्षा सत्यालाच स्थान मिळेल, असा दावा बावनकुळेंनी केला.