‘नरकातील राऊत’ असं पुस्तकाचं नाव ठेवा, बावनकुळेंचा खोचक सल्ला
या पुस्तकाचं नावच चुकीचं आहे. नरकातला राऊत असं नाव ठेवणं अधिक योग्य ठरेल, अशी खोचक प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Chandrashekhar Bawankule : संजय राऊतांनी (Sanjay Raut) नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केलेत. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली, असा दावा राऊतांनी केला. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) प्रतिक्रिया दिली.
या पुस्तकाचं नावच चुकीचं आहे. नरकातला राऊत असं नाव ठेवणं अधिक योग्य ठरेल, अशी खोचक प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.
चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राऊतांनी केलेल्या दाव्यांविषयी विचारले असता ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं. तरीही या पुस्तकात काही वादग्रस्त गोष्टी मांडण्यात आल्यात. विशेष म्हणजे, अमित शाह यांना २०१० मध्ये अटक झाली होती, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र कोर्टाने त्यांना निर्दोष घोषित केलं आहे. त्यामुळे अशा बाबी पुन्हा उकरून काढण्यामागे राजकीय हेतू आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला.
तुम्ही हिंदूंना का शिवीगाळ करता? जावेद अख्तर पाक लष्करप्रमुखांवर संतापले…
या पुस्तकात देशाच्या न्याय व्यवस्थेला बदनाम करण्याचे काम केलं. न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात या पुस्तकात कटेंट असल्यास त्याची चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितांवर कारवाई देखील करावी, असं बावनकुळे म्हणाले.
ते म्हणाले, संजय राऊतांनी या पुस्तकात स्वत:चं नैतिक दिवाळखोरीचं प्रदर्शन केलं. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपली राजकीय अधिपत्याची कहाणी मांडली आहे. मात्र, ही एकतर्फी आणि भ्रामक मांडणी आहे, असं बावनकुळे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांवर आधारित शिवसेना स्थापना केली, आणि भाजप-शिवसेना युती ही सर्वोत्तम ठरली होती. मात्र, संजय राऊतांसारख्या लोकांमुळेच शिवसेनेचा ऱ्हास झाला. त्यांनी कॉंग्रेससोबत युती करून हिंदुत्व विचारधारेपासून फारकत घेतली आणि उद्धव ठाकरेंना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम केलं, अशी खोचक टीका बावनकुळेंनी केली.
बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय नाही
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊतांच्या या पुस्तकावर टोला लगावला. कथा, कादंबऱ्या किंवा बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही. त्यामुळं मी असल्या गोष्टी वाचत नाही, अशी खोचक टीका फडणवीसांनी केलं.