एक दिवस तुमचीही चांगलीच जिरेल.. बाळासाहेब थोरातांचा मंत्री विखेंना टोला

एक दिवस तुमचीही चांगलीच जिरेल.. बाळासाहेब थोरातांचा मंत्री विखेंना टोला

अहमदनगर : राज्याचे प्रश्न सोडविण्याऐवजी काही नेते फक्त जिरवाजिरवीचे राजकारण करत आहेत. मात्र, एक दिवस तुमचीही चांगलीच जिरेल हे लक्षात ठेवा, असा टोला माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांचे नाव न घेता लगावला.

संगमनेर शहरात शनिवारी कांदा आणि वीज प्रश्नांवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात थोरात यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

वाचा : Balasaheb Thorat : .. तर त्यांचे सरकार पडले नसते; बाळासाहेब थोरातांचा फडणवीसांना टोला

ते म्हणाले, की याआधी आमचे सरकार होते त्यावेळी शेतकऱ्यांना मदत करताना कधीही खर्चाचा विचार केला नाही. आजच्या सरकारच्या काळात मात्र शेतकरी दुय्यम झाला आहे. सरकार आज स्मार्ट सिटी आणि मेट्रोत व्यस्त आहे. ही शहरे मोठी झाली ती शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच हे विसरुन चालणार नाही. सध्या व्यापारी कवडीमोल भावाने कांदा खरेदी करून नाफेडला विकत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

Radhakrishna Vikhe Patil : पोपटवाल्या भविष्यवाल्यांची उपासमार करु नका, विखे पाटलांचा पवारांना टोला

राज्यातील राजकारणावर ते म्हणाले,की काही नेत्यांकडून जिरवाजिरवीचे राजकारण सुरू आहे. मात्र त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की एक दिवस त्यांचीही जिरणार आहे. अधिकाऱ्यांनी सुद्धा सरकार आज असते, उद्या नसते त्यामुळे नियमानुसार कामकाज करा. कोणी फोन केला म्हणून जिरवाजिरवी करू नका, असा सज्जड दम थोरात यांनी अधिकाऱ्यांना दिला. महागाईच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

कसबा निवडणुकीत भाजपच्या पराभवावर थोरात म्हणाले, की आम्ही दगड उभा केला तरी निवडून आणू असे म्हणणाऱ्या भाजपला तेथे धूळ खावी लागली. चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोरी झाली नसती तर विजय आमचाच होता. यावरून असे दिसते की जनमत भाजपच्या विरोधात जात आहे. 2024 मध्येही देशाच्या राजकारणात मोठा बदल दिसेल. आता जे सूडाचे राजकारण, वाढती महागाई दिसत आहे याचा परिणाम 2024 च्या निवडणुकीत दिसेल, असे थोरात म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube