आमदार पाचपुतेंच राजकारण संपविण्याचा कट
अहमदनगर: माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांना संपविण्याचा घाट त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी घातला आहे. नुकत्याच झालेल्या उपसरपंच निवडीनंतर आमदार पाचपुते गटाच्या १० सदस्यांनी उगारलेल्या राजीनामा नाट्यावर आमदार पाचपुते यांचे पुतणे काष्टी गावचे सरपंच साजन पाचपुते यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खंत व्यक्त केली.
तसेच राजीनामा देण्याआगोदर ज्या जनतेनी निवडून दिले होते, त्या जनतेला देखील विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार पाचपुते यांचा मुलगा प्रतापसिंह यांचा पुतण्या साजन यांनी पराभव केला होता.
त्यानंतर आमदार पाचपुते गटाला दहा सदस्यांचे बहुमत असतानाही उपसरपंच निवडीत त्यांच्या गटाचे एक मत फुटल्याने झालेला पराभव जिव्हारी लागून त्यांच्या गटातील निवडून आलेल्या दहा सदस्यांनी तडकाफडकी राजीनामे सरपंच साजन पाचपुते यांच्याकडे दिले.
या पार्श्वभूमीवर बोलताना सरपंच साजन पाचपुते यांनी सांगितले की, ज्या जनतेनी निवडून दिले आहे, त्यांच्याशी विश्वासघात करून आमदार पाचपुते गटाच्या दहा सदस्यांनी राजीनामे दिले असून राजीनामे देण्याआगोदर त्यांनी जनतेला विश्वासात घेऊन हा निर्णय गरजेचे होते.
आमदार पाचपुते यांचे उपसरपंच पदासाठी बहुमत असताना त्यांच्यातील एक सदस्य फुटल्याने आमच्या गटाचा सदस्य उपसरपंच झाल्याने नाराज होऊन त्यांनी राजीनामे दिले आहेत. राजीनामे द्यायचे होते तर उपसरपंच निवडी अगोदर द्यायला पाहिजे होते.
असे सांगत या दहा सदस्यांनी हा निर्णय आमदार पाचपुते यांच्या दोन नंबर फळीतील घातकी कार्यकर्त्यांच्या दबावाला बळी पडून घेतला असल्याचे यातून हे सिद्ध होत आहे. या दोन नंबर फळीतील कार्यकर्त्यांना विकासापेक्षा सत्ता महत्त्वाची वाटत आहे.
या राजीनामा नाट्य प्रकरणात माजी मंत्री आमदार पाचपुते यांचा अथवा त्यांच्या घरातील कोणाचा काहीच संबंध नसून आमदार पाचपुते यांचे राजकारण संपविण्यासाठी त्यांच्या जवळच्या काही लोकांनी या दहा सदस्यांना राजीनाम्याचे पाऊल उचलायला भाग पाडले आहे. राजीनामे देऊन सहनभुती मिळणार असे वाटत असेल तर तसे काही होणार नाही.
राजीनामा दिल्यापैकी निम्म्या लोकांनी राजीनामा स्वीकारू नये, यासाठी दुसऱ्या दिवसापासून फोन सुरू केले आहेत. जर राजीनामे द्यायचा असेल तर त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगावे, मी त्यांचे राजीनामे लगेच मंजूर करतो.
येणाऱ्या दोन दिवसात माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन यावर चर्चा करून मी निर्णय घेणार असल्याचे साजन पाचपुते यांनी यावेळी सांगितले.