पवारांचे दोन शिलेदार ‘दत्तामामांना’ सरळ करणार? ‘हर्षवर्धन पाटील खेळणार जुनाच डाव’

पवारांचे दोन शिलेदार ‘दत्तामामांना’ सरळ करणार? ‘हर्षवर्धन पाटील खेळणार जुनाच डाव’

कोंडी झाली, तिकीट नाकारले की उसळी मारायची. छातीला माती लावत अपक्ष शड्डू ठोकायचा किंवा पक्ष बदलायचा हा इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांचा (Harshwardhan Patil) जुना स्वभाव. खरंतर त्यांच्या राजकारणाची सुरुवातच बंडखोरीनेच झाली आहे. त्यामुळे आताही भाजपकडून (BJP) तिकीट नाकारले तर ते काय करतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पाटलांसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (NCP) पायघड्या टाकल्या आहेत. पण त्याऐवजी अपक्ष निवडणूक लढल्यास फायद्याचे राहिल या निष्कर्षापर्यंत ते आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे इंदापूर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार का? की पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशी दुरंगीच लढत राहणार? (Dattatray Bharne of NCP will fight against independent Harshvardhan Patil in Indapur Assembly Constituency)

पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये…

इंदापूर मतदारसंघ म्हणजे पाटील आणि पाटील म्हणजे इंदापूर हे समीकरण अगदी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीपासूनच फिक्स आहे. 1952 पासून शंकरराव पाटील यांनी इंदापूरचे नेतृत्व केले. 1977 पर्यंत ते इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून येत गेले. 1980 मध्ये शंकरराव पाटील बारामती मतदारसंघाचे खासदार झाल्यानंतर राजेंद्रकुमार बाबूराव घोलप हे इथले आमदार झाले.तर 1985 ते 95 या दशकात गणपतराव सीताराम पाटील यांच्या हाती जनतेने इंदापूर तालुक्याची सूत्रे सोपावली.

या दरम्यान, 1984 आणि 1989 साली शंककराव पाटील यांनी काँग्रेसकडूनच लोकसभेची निवडणूक लढवली. यात 1984 साली शरद पवार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. पण 1989 साली पाटील यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. या काळात शरद पवार विरुद्ध शंकरराव पाटील हा वाद प्रकर्षाने दिसून आला. 1980 च्या निवडणुकीत, 1984 च्या निवडणुकीत उभ्या महाराष्ट्राने या दोघांमधील वाद पाहिला होता. अशात 1992 साली पवार घराण्यातून अजित पवार यांची आणि पाटील घराण्यातून हर्षवर्धन पाटील यांची एन्ट्री झाली. इथूनच दुसऱ्या पिढीतील वादालाही सुरुवात झाली.

Ground Zero : आता अजितदादाच शिवतारेंना पुन्हा ‘आमदार’ करणार?

1994 मध्ये हर्षवर्धन पाटील हे जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. पण त्यांना तिकीट नाकारले. त्यांनी अपक्ष अर्ज भरला आणि निवडूनही आले. लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेसने तिकीट नाकारले. त्यांनी अपक्ष उडी घेतली आणि विजयी झाले. 1999 सालीही हेच चित्र राहिले. मात्र या तिन्हीवेळी पवार-काका पुतण्याच्या दबावामुळेच आपल्याला तिकीट नाकारले असे आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केले. 1999 मध्ये निवडून आल्यानंतर पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागली. पण त्यांच्या मंत्रिपदाला अजितदादांनी तीव्र विरोध केला. अगदी विलासराव देशमुख यांचा पाठिंबा काढून घेण्याची धमकीही राष्ट्रवादीने दिली. त्यातून पाटील यांचा राजीनामा घेण्यात आला.

2009 च्या निवडणुकीपूर्वी विलासरावांनी हर्षवर्धन पाटलांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणले. त्यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचे काम केले. त्या बदल्यात विधानसभेला इंदापूरमध्ये अजितदादांनी आपल्याला मदत करावी अशी हर्षवर्धन पाटलांना अपेक्षा होती. पण त्यावेळी अजितदादांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या दत्तामामा भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात अपक्ष रिंगणात उडी घेतली. त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांनीही भरणेंना पाठिंबा दिल्याची चर्चा होती. पण पाटील आठ हजार मतांनी विजय झाला आणि ते मंत्रीही झाले. 2014 साली पाटील यांनी पुन्हा एकदा सुळेंना मदत केली. मात्र विधानसभेला युती तुटली आणि दत्तात्रय भरणे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार झाले. त्यावेळी हर्षवर्धन पाटलांचा 14 हजार मतांनी पराभव झाला. यात पाटील यांचे सख्खे मामा आप्पासाहेब जगदाळे यांनीही भरणे यांच्यासाठी प्रयत्न केले होते.

2019 च्या लोकसभेला पुन्हा पाटील यांनी सुळेंना मदत केली. बदल्यात विधानसभेची जागा काँग्रेसला सोडायची अशी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादीने इंदापूर सोडण्यास नकार दिला. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी भाजपची वाट धरली. पुन्हा दत्तामामा निवडून आले. आताही लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची बैठक पार पडली होती. यानंतर पाटील यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे काम केले. या बदल्यात विधानसभेला भाजपने आपल्याला शब्द दिल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांचा आहे.

Ground Zero : अजितदादांनी विडा उचललाय पण थोपटेंचा गड सर करणं सोपं नाही

पण ‘ज्याचा आमदार त्याची जागा’ असे सूत्र आहे. त्यामुळे दत्तामामा भरणे यांच्या रुपाने इंदापूरची हक्काची जागा कशी सोडायची? असा पेच अजितदादा आणि राष्ट्रवादीपुढे आहे. त्यातून हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. अजितदादांनीही हर्षवर्धन पाटील यांच्या दोन्ही साखर कारखान्यांना कर्जाची थकहमी म्हणून 225 कोटी रुपये देऊ केले. पण हर्षवर्धन पाटील विधानसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यांनी माध्यमांसमोर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. शिवाय ‘तुतारी हातात घ्या’ असा कार्यकर्त्यांचा आग्रह असलेला व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात देखील प्रवेश करू शकतात किंवा अशी चर्चा आहे. पण ते भाजपवरही दबाव तयार करत असावेत असे बोलले गेले होते.

दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या निवडणुकीपासून दत्तात्रय भरणे शरद पवार यांच्या रडारवर आहेत. “इंदापूरच्या सभेतून ‘अरे मामा जरा जपून, लक्षात ठेवा, सरळ करायला वेळ लागणार नाही’ असा थेट इशारा दिला होता. त्यामुळे हर्षवर्धन पाटील नाही आले तरी शरद पवार यांनी तगडे पर्याय तयार ठेवले आहेत. सोनाई उद्योग समूहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र शरद पवार यांच्या डोक्यात नाव आहे ते आप्पासाहेब जगदाळे यांचे. ते सध्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती आहेत.

दोन मोठ्या साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, बाजार समितीचे सभापती, काही संचालक, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आणि हजारो कार्यकर्त्यांची फौज घेऊन आप्पासाहेब जगदाळे यांनी लोकसभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. 2019 च्या निवडणूकीत केवळ दत्तात्रय भरणे यांना विरोध म्हणू आप्पासाहेब जगदाळे गट राष्ट्रवादीपासून बाजूला झाला होता. यंदाच्या लोकसभेला मात्र जगदाळे गटाने तालुक्यात ताकद लावली. जुन्या नव्या पवारांच्या कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले. त्याचा परिणाम भरणे आणि पाटील एकत्र असतानाही सुळे यांना 26 हजारांहून अधिकचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे यंदाची इंदापूर मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार हे नक्की आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube