“अकेला देवेंद्र क्या करेगा?” दुसऱ्या निवडणुकीपूर्वीच फडणवीसांनी बदला पूर्ण केला!
“अकेला देवेंद्र क्या करेगा, मिळालं का उत्तर?, काका म्हणायचे 105 घरी बसवले… पण त्यांनाच कधी घरी बसवले कळले नाही, मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस शाळेत होते… पण त्याच फडणवीसांनी चाणाक्ष बुद्धीने तुमच्या राजकीय कारकिर्दीला शेवटचा खिळा ठोकला आहे… ” अशा आशयाच्या शेकडो पोस्ट कालपासून भाजप कार्यकर्त्यांच्या आणि भक्तांच्या फेसबुक वॉलवर पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कडाडून टीका केली जात आहे.
या पोस्टचे कारणही स्पष्ट आहे. निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि झेंडा अजित पवारांच्या गटाला बहाल केला. यापूर्वी शिवसेना पक्षही एकनाथ शिंदे यांच्या हवाली केला. या दोन्ही गोष्टाींमागे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नावाचे चाणाक्ष राजकारणीच आहेत असा दावा भाजपचे कार्यकर्ते करत आहे. शिवाय फडणवीस यांनी पाच वर्षातील दोन जखमांचा कसा बदला घेतला हे रंगवून सांगितले जात आहे. पुढील काही दिवस तरी सोशल मीडियावर आपल्याला हेच चित्र बघायला मिळेल.
पण फडणवीस यांच्या त्या दोन जखमा कोणत्या होत्या आणि त्या कशा झाल्या होत्या? भाजपचे कार्यकर्ते दावा करत आहेत तो ठाकरे पवारांचा त्यांनी कसा बदला घेतला? हेच आपण पाहुया.
2019 ची विधानसभा निवडणूक. भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी. निवडणुकीचा निकाल लागला अन् युतीने दणदणीत बहुमत मिळविले. आता सत्ता स्थापन होणार अन् भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असेच सर्वांना वाटत होते. पण माशी शिंकली. भाजपने आपल्याला सत्तास्थापनेत समसमान वाट्याचे आश्वासन दिले होते असे म्हणत शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला.
पहिले अडीच वर्षे किंवा दुसरी अडीच वर्षे हे आश्वासन घेतल्याशिवाय शिवसेना पुढे जाण्यास तयार होईना. निकाल लागून दोन दिवस गेले, चार दिवस झाले तरी चर्चा पुढे जात नव्हती. शिवसेनेच्या गोटातही वेगळ्याच हालचाली सुरु होत्या. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येत भाजपला दूर ठेवता येईल का याबाबत चर्चा सुरु केल्या.
Pawar Vs Pawar : पक्ष, चिन्हानंतर आता अजितदादांचा डोळा ‘मलईदार’ कार्यालय अन् फंडांवर?
हळू हळू चर्चा पुढे सरकरत होत्या आणि भाजपीच धाकधूक वाढत होती. मग भाजपनेही पडद्याआडून जुळवाजुळव करायला सुरुवात केली. पण बहुमताचा आकडा काही गाठता येत नव्हता. नंबर गेम फसत होता. आठ नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपणार होती. त्यापूर्वी नवीन सरकार स्थापन होणे गरजेचे होते. पण 22 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाल्यानंतर पंधरा दिवस उलटल्यानंतरही काहीच हालचाली होत नव्हत्या. फडणवीस म्हणत होते शिवसेनेने पुढे येऊन चर्चा करावी. ते माझा फोनच उचलत नाहीत. माध्यमांमधून चर्चा होत नसते.
उद्धव ठाकरे आणि पवारांनी मिळून जवळपास सगळी वाटाघाटी मार्गी लावली होती. प्रश्न होता काँग्रेसचा. काँग्रेसला वेळ हवा होता. या चर्चा सुरु असतानाच जे फडणवीस पंधरा दिवस आधी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची तयारी करत होते त्याच फडणवीसांनी आठ नोव्हेंबरला अत्यंत दुःखद चेहऱ्याने आणि जड अंतःकरणाने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. इथेच ठाकरे पवारांनी फडणवीसांना पहिली खोल जखम केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.
मात्र ही जखम विसरुन फडणवीस पुन्हा कामाला लागले. शिवसेनेला धडा शिकवायचा यासाठी त्यांनी महाविकास आघाडीलाच सुरुंग लावण्याची तयारी सुरु केली. ज्या राष्ट्रवादीसोबत जाऊन ठाकरे मुख्यमंत्री होण्याची तयारी करत होते त्याच राष्ट्रवादीच्या अजित पवारांना हाताशी धरुन ठाकरेंना धडा शिकविण्याचा प्लॅन फडणवीस आखत होते.
तिकडे शरद पवारांनी काँग्रेसलाही सोबत येण्यास तयार केले. 25 नोव्हेंबरला तिन्ही पक्षांची एकत्र बैठक झाली. या बैठकीत ठाकरेंच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला. ज्या रात्री तिन्ही पक्षांचे एकमत झाले, त्याच रात्री फडणवीस अन् अजितदादांचेही एकमत झाले. वेळ न दवडता फडणवीसांनी राज्यपालांकडे रात्रीच सत्तास्थापनेचा दावा केला. रात्रीच राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली अन् सकाळी आठ वाजता दोघांचा शपथविधीही झाला. संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.
त्यात राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे आमदारांचा घोडेबाजार होण्याची दाट शक्यता होती. शिवाय अजितदादा गटनेते असल्याने त्यांना व्हीप काढण्याचा अधिकार होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदारही चिंतेत होते. पण पवारांनी आपला सर्व राजकीय अनुभव पणाला लावला अन् सर्वोच्च न्यायालयातून बहुमत दोन दिवसांत सिद्ध करण्याचा आणि शिरगणतीने सिद्ध करण्याचा निकाल आणला. हाच अजितदादांना पहिला झटका बसला. त्यांनी त्याचवेळी राजीनामा दिला. फडणवीसांनीही बहुमत नसल्याचे म्हणत अवघ्या 20 दिवसांत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांच्या मींधे गँगमध्ये प्रवेश करणाऱ्यांची परेड काढणार का? राऊतांचा सवाल
ठाकरे-पवारांनी फडणवीसांना दिलेली ही दुसरी मोठी जखम होती. पण ही जखम लक्षात ठेवून फडणवीसांनी विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारला अन् कामला सुरुवात केली. पण ज्या दिवशी विरोधी पक्षनेत्याचे जॅकेट त्यांनी घातले त्यादिवसापासून असाही एकही दिवस नव्हता ज्यादिवशी त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला घाम फोडला नव्हता. कोविडमधील घोटाळे, मंदीर उघडण्यासाठीचे आंदोलन, मनसुख हिरेन हत्या प्रकरण, बदली घोटाळा अशा अनेक प्रकरणांनी त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले.
विरोधी पक्षनेत्याचे काम सुरु असतानाच फडणवीसांनी अनिल देशमुख, नवाब मलिक अशा नेत्यांना तुरुंगात पाठविण्यात महत्वाची भूमिका बजावली. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने बहुमत नसतानाही आकडेवारीचा गेम जमवत तिसरा उमेदवार निवडणून आणला. त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचही उमेदवार निवडून आणले. महाविकास आघाडीला दहा दिवसांमध्ये दोनवेळा पराभवाचा जबरदस्त धक्का दिला. पण अजूनही त्यांच्या त्या दोन जखमा भरुन निघाल्या नव्हत्या.
अजून मोठा धमाका होणे बाकी होते. 21 जूनला एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या विरोधात बंड केले आणि थेट शिवसेनेवरच दावा ठोकला. तिथूनच राज्याच्या राजकारणाला दुसरी मोठी कलाटणी मिळाली. ज्या फडणवीसांनी राजीनामा देऊन खिन्न मनाने वर्षा सोडायला लागले होते त्याच वर्षा बंगल्यातून उद्धव ठाकरे बाहेर पडले. 29 जूनला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला. 30 तारखेला शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुढच्या आठ महिन्यात शिंदेंनी शिवसेना ताब्यात घेतली. फडणवीसांची पहिली जखम भरुन निघाली.
जुलै 2023 मध्ये शिंदेंच्या पावलावर पाऊल टाकत अजितदादांनी बंड केले आणि त्यांनीही थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकला. नुकताच निवडणूक आयोगाने निकाल देत राष्ट्रवादी अजितदादांच्या पारड्यात टाकली. ज्या पवारांनी महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेतला, काँग्रेसची समजूत काढत बहुमताचा आकडा जुळवा होता त्याच पवारांकडून फडणवीसांनी आधी पुतण्या आणि आता पक्षही भाजपसोबत आणला. फडणवीसांची दुसरी जखमही भरुन निघाली. अवघ्या पाच वर्षांमध्येच फडणवीसांनी बदला घेतला. वर्तुळ पूर्ण केले. स्वतः फडणवीस यांनीही एकदा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतमीध्ये स्पष्टपणे म्हंटले होते की होय मी बदलाच घेतला!