‘भाजपचा भावी नेता’…मंत्री गिरीश महाजनांची आमदार मंगेश चव्हाणांवर कौतुकाची थाप
'भाजपचा भावी नेता', या शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर कौतुकाची थाप मारलीयं. ते जळगावात कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
Girish Mahajan On Mangesh Chavan : भाजपचा भावी नेता म्हणत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्यावर कौतुकाची थाप मारलीयं. जळगाव जिल्ह्यात विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील एकाच व्यासपीठावर दिसून आले. या कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी मंगेश चव्हाण यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत स्तुती केली आहे.
पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मंगेश चव्हाण यांच्या रुपाने दूरदृष्टीकोन असलेला व प्रामाणिकपणे काम करणारा नेता तालुक्याला लाभला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांना आमचे सात टर्मचे आमदारकीचे रेकॉर्ड मोडायचे आहे. नुसत्या रस्ते, इमारती बांधून होत नाही, तर लोकांशी, कार्यकर्त्यांशी बांधिलकी महत्त्वाची असते. त्यामुळे मंगेश चव्हाणांमध्ये आम्ही उद्याचा जिल्ह्याचा मोठा नेता पाहत असल्याचं महाजन म्हणाले आहेत.
वाराणसीत संतापजनक प्रकार; नर्सरीतील चिमुकल्याच्या गुप्तांगाला शिक्षिकेकडून चटके, गुन्हा दाखल
तसेच भाजपने मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली, तेव्हा त्यांची राजकीय ओळख मर्यादित होती. अत्यंत कमी मताधिक्याने ते निवडून आले होते. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने विकासकामांचा धडाका लावला, ते पाहून आम्हालाही त्यांचा हेवा वाटतो आहे. चाळीसगावसाठी आम्ही त्यांची निवड केल्याचा आम्हाला अभिमान आहे. एक चांगला कार्यकर्ता, नेता, लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंगेशदादा असल्याचं महाजन म्हणाले.
मंगेश दादामध्ये मी या जिल्ह्याचा उद्याचा नेता बघतोय. आम्ही आजून किती दिवस आहोत? सात टर्म झाल्या, आणखी एखादी-दुसरी टर्म होईल. आमच्या वयाचा विचार करता आम्ही किती दिवस काम करणार आहोत, कुठेतरी थांबलं पाहीजे, स्मशानात जाईपर्यंत मीच अशी भूमिका योग्य नाही. त्यामुळे आपण कुठे थांबायचं ते आपल्याला समजायला हवं. कोणाच्या तरी चांगल्या हातात पक्षाची धुरा द्यावी लागणार आहे. त्यावेळी मंगेश चव्हाण हे नाव भावी नेता म्हणून सांगावं वाटतं., असंही गिरीश महाजन म्हणाले आहेत.
दरम्यान, महाजन यांनी पूर्वीच्या कामकाजाच्या पद्धतीवर टीका करत, आता पारदर्शक कारभारामुळे दर्जेदार विकासकामे होत असल्याचे सांगितले. तसेच नाव न घेता एका ज्येष्ठ नेत्यावरही टोला लगावत, “स्मशानापर्यंत मीच” अशी भूमिका योग्य नसल्याचे सूचक वक्तव्य केले. याशिवाय केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विकासकामांचा आणि राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचाही त्यांनी उल्लेख केला.