‘आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित, आगामी अधिवेशनात यावर…’; सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी
Supriya Sule : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे आरक्षणासाठी (Maratha reservation) आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाने राज्य सरकारला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २४ डिसेंबरची मुदत दिली. तर सरकारनेही आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली. आता मराठ समाज शांत होत नाही तोच धनगर समाजानेही आरक्षणाची मागणी केली आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी अधिवेशनात आरक्षण हा विषय चर्चेसाठी मांडावा. तसेच यासाठी वेळ द्यावी, अशी मागणी केली आहे.
Dilip Prabhavalkar: दिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर
सुप्रिया सुळे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट टाकली. त्यात त्यांनी लिहिलं की, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठा व धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव आंदोलन करीत आहेत. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची बहुमतातील सत्ता असून सुध्दा या समाज घटकांचे आरक्षणाचे प्रश्न जसंच्य तसेच आहे, असं त्या म्हणाल्या.
Maratha Reservation: आंदोलनामागे कोण हे शोधून काढावे; मनोज जरांगेंचे राज ठाकरेंना थेट चॅलेंज
या समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. परिणामी त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे. तरुणांच्या या प्रश्नावर आत्महत्या होत आहेत. ही मोठी चिंताजनक परिस्थिती आहे. आरक्षणाचे हे विषय सभागृहात मांडले जाऊन ते मंजूर होणं आवश्यक आहे. तरी मा. लोकसभा अध्यक्ष महोदयांना नम्र विनंती आहे की आरक्षणाचा विषय मांडून त्यावर चर्चा करावी. आपण या आगामी अधिवेशनात यासाठी वेळ द्यावी, ही नम्र विनंती, असं त्यांनी लिहिलं. हे ट्वीट सुप्रिया सुळेंनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना टॅग केलं.
मागील काही महिन्यांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे. त्याला ओबीसी नेत्यांचा जोरदार विरोध आहे. मात्र, आता मराठा समाजाप्रमाणेच इतर समाजाकडूनही आरक्षणाची मागणी होत आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मराठा समाजाने राज्य सरकारला 25 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर आता दुसरीकडे धनगर समाजाने सरकारला 50 दिवसांची मुदतवाढ दिली होती. ती मुदत आता संपली असून उद्यापासून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभुमी असलेल्या चौंडी येथे धनगर समाजाचे आमरण उपोषण सुरू होणार आहे. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संपूर्ण धनगर समाज पुन्हा एकदा मैदानात उतरला. त्यामुळं सरकारच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
दरम्यान, आता सुप्रिया सुळेंनी आगामी अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा सभागृहात चर्चिल्या जावा, अशी मागणी केली. त्यामुळं आरक्षणाच्या मुद्यावर संसदेत चर्चा होऊन मराठा, धनगर समाजाला आरक्षण मिळणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.