Kirit Somaiya : ‘जवाब तो देनाही पडेगा’ : सोमय्यांचा मुश्रीफांवर निशाणा
मुंबई : भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार हसन मुश्रीफांवर ( Hasan Mushrif ) निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडीओत मुश्रीफांना उत्तर द्यावेच लागेल असे म्हटले आहे. मुश्रीफ कुटुंबाच्या ब्रिस्क फॅसिलिटीज (शुगर डिव्हिजन) प्रायव्हेट लिमिटेडचे ₹156 कोटींचे थकित कर्ज डीफॉल्ट NPA, या कर्जाची हसन मुश्रीफ यांनी स्वत: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष म्हणून समायोजित पुनर्रचना केली आहे. याला कोणतीही योग्य परवानगी नसून मागच्या तारखेची नोंद देखील नाही आहे, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.
हसन मुश्रीफ यांनी बँक प्रशासनाच्या संगनमताने बँकेची लूट केल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. यावर जवाब तो देना ही पडेगा असा टोला किरीट सोमैया यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर ईडीने छापे टाकले आहेत. त्यांच्या घरावर देखील ईडीने छापेमारी केली आहे. तसेच मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेवर देखील ईडी छापे टाकले आहेत. हसन मुश्रीफांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी ईडीकडे तक्रार दाखल केली आहे.
सोमय्यांनी केलेले सर्व आरोप हे मुश्रीफांनी नाकारले आहेत. एक जरी आरोप खरा निघाला तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे मुश्रीफांनी म्हटले आहे. तसेच हे सर्व माझ्या बदनामीसाठी षड्यंत्र रचलं जात असून यामागचा बोलवता धनी लवकरच उघड करू, असा इशारा देखील त्यांनी दिला.