महाविकास आघाडीला धक्का, कुलदीप कोंडे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र!
Kuldeep Konde Joins Shiv Sena Shinde Group : लोकसभा निवडणुकीच मतदान काही दिवसांवर आलेलं असताना महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भोरमधून विधानसभेसाठी इच्छूक असलेले कुलदीप कोंडेंनी ठाकरेंच्या शिससेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंत आयोजित केलेल्या सभेत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
विजय शिवतारे यांनी केला संपर्क
काही दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान, महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भोरमधून महाविकास आघाडीचे संग्राम थोपटेच उमेदवार असतील आणि ते आज चांगल सहकार्य करत आहेत. त्यामुळे विधानसभेला आपण त्यांच्यासाठी त्यांच्यापेक्षा दहा पटीने मेहनत घेऊ अस वक्तव्य केलं होतं. त्यानंतर ठाकरे गटात असलेले कुलदीप कोंडे नाराज असल्याची चर्चा होती. त्या नाराजीचा फायदा घेत माजी आमदार विजय शिवतारे यांनी त्यांच्याशी संपर्क करून अखेर महायुतीत आणलं. त्यानंतर हा महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.
दोनवेळा झाला पराभव
मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये कुलदीप कोंडे यांना काँग्रेस उमेदवार संग्राम थोपटे यांच्या विरोधात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर यावेळी शिवसेना राष्ट्रवाद आणि काँग्रेस एकत्र असल्याने ही जागा कुणाला जाईल याबद्दल कोंडे यांना शंका होती. परंतु, आपल्या ही जागा मिळणार नसून ती थोपटेंनाच मिळणार आहे हे जवळपास निश्चित मानलं जात असल्याने कोंडे यांनी अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.