Lok Sabha Polls: महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा, मुंबईत शिंदे विरुद्ध ठाकरे; वाचा महत्वाच्या लढती

Lok Sabha Polls: महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा, मुंबईत शिंदे विरुद्ध ठाकरे; वाचा महत्वाच्या लढती

Fifth Phase Lok Sabha Polls Mumbai : पाचवा टप्पा 20 मे 2024 रोजी पार पडणार असून, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण 13 मतदारसंघांत मतदान होणार आहे. या गेली आठ दिवसांपासून सुरू असलेला प्रचार आज थंडावला. यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही जागांवर थेट लढत होत आहे.

 

महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांमध्ये मतदान

पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईतील उत्तर, उत्तर-पश्चिम, उत्तर-पूर्व, उत्तर-मध्य, दक्षिण-मध्य आणि दक्षिण मुंबई मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, पालघर, धुळे, दिंडोरी, नाशिक, भिवंडी या 13 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. या सर्वच ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह अपक्षांनी प्रचारात चांगलाच जोर लावल्याचं मागील आठ दिवसांत बघायला मिळालं आहे.

 

सर्वच नेत्यांच्या सभा

मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहभाग घेऊन वातावरण तापवलं. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी रोड शो, कॉर्नर सभा आणि रॅलींचे आयोजन करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तर, महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संयुक्त सभा घेतली.

 

किती उमेदवार रिंगणात

20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहाही मतदारसंघांतून एकूण 116 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सहा मतदारसंघांतून नामनिर्देशनासाठी एकूण २२३ अर्ज आले होते. त्यापैकी 140 स्वीकृत, 75 नामंजूर, तर आठ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. स्वीकृत अर्जांच्या यादीमध्ये एकाच उमेदवाराने सादर केलेल्या डुप्लिकेट शपथपत्रांचाही समावेश आहे. मुंबईच्या उत्तर मध्य मतदारसंघात 27 उमेदवार मतदानात भाग घेतील जे मुंबईत सर्वाधिक आहे, त्यानंतर मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात 21 उमेदवार, मुंबई ईशान्य मतदारसंघात 20, उत्तर मुंबईमध्ये 19, मुंबई दक्षिण मध्यमध्ये 15 आणि 14 उमेदवार आहेत. त्याचबरोबर, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मुंबईत यंदा 53.24 लाख पुरुष आणि 45.68 लाख महिला मतदारांची नोंदणी झाली आहे.

 

कोणता पक्ष किती जागा

मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना समोरासमोर आहे. तर मुंबईतील उर्वरित ३ जागांपैकी २ जागांवर भाजपा आणि काँग्रेस तर एका जागेवर उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि भाजपा आमनेसामने आहे. मुंबईत ६ जागा आहेत, ज्यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या जागा आहेत. त्यातील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघात शिंदे-ठाकरेंमध्ये सामना आहे. तर ईशान्य मुंबईत भाजपाविरुद्ध उद्धव ठाकरे अशी ही लढत होणार आहे.

 

कोण कुणाच्या विरोधात रिंगणात

उत्तर मध्य मुंबई – उद्धव ठाकरे राहत असलेला परिसर हा उत्तर मध्य मुंबईत येतो, इथं काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना संधी दिली आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि कुटुंब काँग्रेसच्या पंजावर मतदान करणार आहेत. 2014 च्या निवडणुकीनंतर काँग्रेसनं मुंबईतील एकही जागा जिंकली नाही.

 

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकर यांचा सामना शिंदेचे रवींद्र वायकर यांच्यासोबत होणार आहे. वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे आमदार आहेत. शिवसेना फुटीनंतरही वायकर ठाकरेंसोबत होते. परंतु काही महिन्यांपूर्वीच ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाले.

 

ईशान्य मुंबईत भाजपाने मिहिर कोटेचा यांना तर मविआकडून ठाकरेंचे संजय दिना पाटील यांच्यात लढत होतेय. कोटेचा हे मुलुंड विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. तर संजय दिना पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आहेत ज्यांनी 3 वर्षापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

 

दक्षिण मुंबई- ठाकरेंचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदेंकडून यामिनी जाधव अशी लढत होणार आहे. जाधव या भायखळा विधानसभेतून आमदार आहेत. दक्षिण मध्य मुंबईत ठाकरेंचे अनिल देसाई विरुद्ध शिंदेंचे राहुल शेवाळे असा सामना आहे. देसाई हे राज्यसभेचे तर राहुल शेवाळे विद्यमान लोकसभेचे खासदार आहेत.

 

2019 पर्यंत मुंबईत शिवसेना आणि काँग्रेस परंपरागत विरोधक होते. मात्र, दोन्ही पक्षांनी सत्तेसाठी अनेकदा राजकीय रणनीती आखली. मुंबईच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये फारसं सख्य असल्याचं चित्र नव्हतं.

 

2022 मध्ये शिवसेना फुटीनंतर मुंबईत अंधेरी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पोटनिवडणूक झाली. त्यात ठाकरे गटाने विजय मिळवला होता. या निवडणुकीत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपानेही कुठलाही उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता.

 

भाजपाने 2024 च्या निवडणुकीत मुंबईतील तिन्ही विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून दुसऱ्यांना उमेदवारी दिली. तर शिंदेंच्या शिवसेनेने राहुल शेवाळे यांना पुन्हा रिंगणात उतरवले. तर उत्तर पश्चिम मतदारसंघातून गजानन किर्तीकरांऐवजी वायकर यांना उभे केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज