महिला राजकारणात कमीच पण, भारतात ‘या’ महिलांच्या नावावर जिंकण्याचं अनोखं रेकॉर्ड…

महिला राजकारणात कमीच पण, भारतात ‘या’ महिलांच्या नावावर जिंकण्याचं अनोखं रेकॉर्ड…

Lok Sabha Election : फक्त भारतातच नाही तर जगभरातील राजकारणात महिलांचा टक्का कमी राहिला आहे. मागील वर्षात ज्या 52 देशांमध्ये निवडणुका झाल्या त्यातील सहा देश असे आहेत जिथे पाच पेक्षा कमी महिला खासदार आहेत. ओमान देशात तर एकही महिला निवडून आलेली नाही. मागील एक वर्षाच्या काळात संसदेतील महिलांच्या भागीदारीत काहीच सुधारणा झालेली नाही. भारताचा विचार केला तर परिस्थिती फार काही वेगळी नाही.

2019 मधील लोकसभा निवडणुकीत 78 महिला उमेदवार निवडणूक जिंकून संसदेत पोहोचल्या होत्या. यातील 12 महिला अशा होत्या ज्यांनी तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडणूक जिंकली आहे. भाजप नेत्या मेनका गांधी रेकॉर्ड 8 वेळा निवडणूक जिंकून संसदेत पोहोचल्या होत्या. चला तर मग जाणून घेऊ या अशा महिला खासदरांबद्दल ज्यांनी निवडणूक जिंकण्याचे खास रेकॉर्ड बनवलं आहे.

मेनका गांधींची पहिली निवडणूक राजीव गांधींच्या विरोधात

मेनका गांधी सध्या उत्तर प्रदेशातील सुलतानपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. भाजपने त्यांना यंदाही तिकीट दिले आहे. मागील चार सरकारच्या काळात त्या मंत्री राहिल्या आहेत. 2014 ते 2019 या मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मेनका गांधी केंद्रीय महिला बालविकास मंत्री राहिल्या. याआधी त्या 2014 ते 2019 मध्ये पीलिभीत मतदारसंघातून खासदार राहिल्या आहेत. मेनका गांधी यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात 1984 मध्ये राजीव गांधी यांच्या विरोधात अमेठी मतदारसंघात निवडणूक लढून केली होती. या निवडणुकीत मेनका गांधी 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभूत झाल्या होत्या.

यानंतर 1989 ते 91 या काळात जनता दलाच्या तिकिटावर त्या निवडणूक जिंकल्या. 1996 ते 1998 त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर पीलिभीत मतदारसंघातून विजय मिळवला होता. यानंतर 1998-99 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून यश मिळवले होते. 1999 ते 2004 या काळात त्या पुन्हा अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2004 ते 2009 या काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर विजय मिळवला होता.

उत्तर भारतात दक्षिणचा व्यूह? काँग्रेसचे दक्षिणेतील ‘मॅचविनर’ राहुल गांधींच्या सोबतीला…

रायबरेलीत सोनिया गांधी पाच वेळा विजयी

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून पाच वेळा विजयी झाल्या आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला. यानंतर राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीत सोनिया गांधी बिनविरोध विजयी झाल्या. 1999 मध्ये सोनिया गांधींनी कर्नाटकातील बेल्लारी आणि उत्तर प्रदेशातील अमेठी या दोन मतदारसंघांतून विजय मिळवला होता. यानंतर त्यांनी अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणे पसंत केले. 2004 मध्ये त्यांनी रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवला. यानंतर त्या या मतदारसंघातून विजयी होत राहिल्या.

भावना गवळी 25 वर्ष खासदार पण, यंदा पत्ता कट

भावना गवळी महाराष्ट्रातील यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. यंदाही त्या निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु शिंदे गटाने त्यांना तिकीट नाकारले. भावना गवळी 1999 पासून या मतदारसंघातून खासदार आहेत. मागील 25 वर्षांपासून त्या खासदार आहेत. यंदा मात्र त्या निवडणुकीत दिसणार नाहीत. शिंदे गटाने त्यांच्याऐवजी राजश्री पाटील यांना तिकीट दिलं आहे.

संगीता सिंह देव

ओडिशातील संगीता पाच वेळेस खासदार राहिल्या आहेत. 1998, 1999 आणि 2004 मध्ये त्यांनी बोलांगीर मतदारसंघातून विजय मिळवला होता. परंतु 2009 आणि 2014 या दोन निवडणुकांमध्ये कुटुंबातील सदस्याकडूनच त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांनतर मागील निवडणुकीत त्यांना भाजपने उमेदवारी दिली आणि मोदी लाटेत त्या विजयी झाल्या.

‘कांद्याचा वांदा’ : निर्यातबंदी हटवल्यानंतरही पाकिस्तान पळवणार भारताचे ग्राहक देश

बिहार राज्यातील शिवहर मतदारसंघातून रमा देवी खासदार आहेत. रमा देवी पहिल्यांदा 1988-99 मध्ये राजदच्या तिकिटावर मोतीहारी मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. 2014 मध्ये त्या तिसऱ्यांदा शिवहरमधून खासदार म्हणून निवडून आल्या. 2019 च्या निवडणुकीतही त्या विजयी झाल्या होत्या.

परनीत कौर

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांची पत्नी परनीत कौर सध्या पटीयाला मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या खासदार आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भाजप नेते अमरिंदर सिंह यांना समर्थन दिले म्हणून फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. त्यांनी 1999, 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. मात्र 2014 मधील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. परंतु 2019 मध्ये त्यांनी या मतदारसंघातून पुन्हा विजय मिळवला.

हरसिमरत कौर यांची हॅट्रीक

पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बठिंडा मतदारसंघाच्या खासदार आहेत. कौर यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात 17 डिसेंबर 2020 मध्ये केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 2009 मधील निवडणुकीत हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती. 2019 मध्ये त्यांनी सलग तिसऱ्या वेळेस खासदार म्हणून निवडणूक जिंकली.

सुप्रिया सुळेंचीही हॅट्रीक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. सन 2009 पासून सुळे या मतदारसंघाच्या खासदार आहेत. याआधी 2006 ते 2009 या दरम्यान त्या राज्यसभा खासदार राहिल्या आहेत. आताही सुळे लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करत आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज