असली वक्तव्यं आधी बंद करा.. अजितदादा नाना पटोलेंवर भडकले !
Ajit Pawar : महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांकडून सातत्याने परस्पर विरोधी वक्तव्ये दिली जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वक्तव्यांचा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पटोले यांच्या वक्तव्यांवर टीका केली.
ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या संदर्भात वेगवेगळी वक्तव्ये वेगवेगळ्या लोकांकडून आली. त्यामुळे वेगळ्या बातम्या पसरल्या गेल्या. महाविकास आघाडीत अंतर पडते की काय, अशा चर्चा झाल्या असतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नेहमी अशा प्रकारची वक्तव्ये करतात. त्यांच्या या वक्तव्यांनंतर कारण नसताना महाविकास आघाडीत अंतर पडू शकते. मिडीयापर्यंत वक्तव्ये जाण्याऐवजी त्यांनी जयंत पाटलांशी बोलावं. माझ्याशी बोलावं किंवा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबरोबर बोलावं. यातून काहीतरी मार्ग निघू शकतो ना.’
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग: नितीश-तेजस्वींनी घेतली राहुल गांधींची भेट
‘टाळी एका हाताने वाजत नाही. अशा वक्तव्यांमुळे कार्यकर्ते देखील संभ्रमात पडतात. हे आधी बंद केले पाहिजे. महाविकास आघाडीची सभा होईल त्यावेळेस मी या गोष्टी जरुर तेथे मांडणार आहे’, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला.
नाक खुपसणार नाही
काँग्रेसमध्ये सध्या जी धुसफूस आहे ती महाविकास आघाडीत सगळे काही आलबेल नाही यासाठी कारणीभूत आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, मला याबाबत काही माहिती नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही. ज्या त्या पक्षाने त्यांचे अंतर्गत प्रश्न त्यांच्या पातळीवर सोडवावेत त्यावर काही सूचना देण्याचा किंवा त्यात नाक खुपसण्याचा अधिकार आम्हाला नाही. पण आघाडी टिकावी असे आम्हाला वाटते.
शाब्दिक चकमकीनंतर आमदार वैभव नाईकांच्या अंगावर राणे समर्थक धावले…
बाजार समितीत आघाडी कुठेच नाही
राज्यात सध्या बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. 20 एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर अजित पवार म्हणाले, अशी कुठेच आघाडी झालेली नाही. लातूरचे काही कार्यकर्ते माझ्याकडे आले होते. काँग्रेसकडून विचारात घेतले जात नाही अशी तक्रार त्यांनी केली. त्यावर मी त्यांना जयंत पाटील यांच्याशी बोलण्यास सांगितले. मात्र अद्याप कुठेच अशी आघाडी झालेली नाही.
काय म्हणाले पटोले ?
नाना पटोले यांनी गोंदिया बाजार समिती निवडणुकीत भाजपबरोबर युती करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसही शेतकरीविरोधी असेल अशी टीका केली होती. यानंतर संतप्त होत अजित पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.