‘दिल्लीच्या बादशाहाच्या पाया पडायला गेले असतील’; राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर दानवेंचा खोचक टोला
Ambadas Danve Criticized Raj Thackeray Delhi Visit : लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. त्यात आता राज्यातील महायुती आणखी मोठी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मनसे हा पक्ष महायुतीमध्ये म्हणजे एनडीए (NDA) आघाडी सहभागी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे सोमवारी तातडीने दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्रातील भाजपचे काही नेतेही दिल्लीत आहेत. हे नेते व राज ठाकरे यांची गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या घरी बैठक होणार आहे. राज ठाकरेंच्या या दिल्ली दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी खोचक टीका केली आहे. दिल्लीच्या बादशाहच्या पाया पडायला गेले असतील अशी खोचक टीका दानवे यांनी केली.
“मला काहीच माहिती नाही, मला बोलावलं म्हणून मी”.. दिल्लीत पोहोचताच राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत पत्रकारांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना प्रश्न विचारला. त्यावर दानवे यांनी खोचक शब्दांत उत्तर दिले. दिल्लीच्या बादशाहाच्या पाया पडायला गेले असतील. राज ठाकरे भाजपसोबत जातील, असे होऊ शकत नाही. गेले तर काहीतरी देतील, एखादा तुकडा टाकतील असे दानवे म्हणाले. अजून पुढे काय काय घडतंय ते पाहू. ते आताच गेले आहेत त्यामुळे या मुद्द्यावर नंतर बोलू, असेही दानवे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारीच दिल्लीत गेले आहे. त्यानंतर राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे हे महायुतीमध्ये गेल्यास त्यांना दोन लोकसभा जागा दिल्या जाऊ शकतात. दक्षिण मुंबई आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ मनसेला हवे आहेत.
महायुतीमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) हाही महत्त्वाचा पक्ष आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेकदा एकमेंकाना भेटलेले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांना बरोबर घेण्यास तयार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारपरिषदेत राज ठाकरे आमची विचारधारा मानणारे नेते आहेत. त्यामुळे योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.