चर्चा तर होणारच ना! अजित पवार, जयंत पाटलांनंतर नाना पटोलेही भावी मुख्यमंत्री
Nana patole News : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील धुसफूस सातत्याने समोर येत आहे. आता तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशातच तिन्ही घटक पक्षांत कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. कधी एकमेकांना चिमटे घेत तर कधी दबाव टाकत राजकारण सुरू आहे. त्यातच आता नेत्यांचे कार्यकर्ते अन् समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री, भावी खासदार म्हणत होणाऱ्या बॅनरबाजीची भर पडली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून भंडारा शहरासह जिल्ह्यात मोठे बॅनर झळकले आहे. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Must Read : अखेर संजय राऊतांना शहाणपण सुचलं; म्हणाले, मी अजित पवारांबद्दल जे बोललो..
नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त काल (दि.3) भंडारा शहरासह जिल्ह्यात मोठी बॅनरबाजी करण्यात आली. यामध्ये सर्व बॅनर्सवर पटोले यांचा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. भंडाऱ्यातील साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाना पटोले यांचा उद्या (सोमवार) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी पटोले यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत.
भंडारा शहरातील जिल्हा परिषदेच्या आवार भिंतीवर पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला बॅनर दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती मदन रामटेके, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती रमेश पारधी, पवन वंजारी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनीत देशपांडे यांनी हे बॅनर लावले आहेत. याव्यतिरिक्त पटोले यांच्या घरापासून साकोली लाखनी या त्यांच्या मतदारसंघातही बॅनर दिसत आहेत.
भाजपसाठी गुडन्यूज! काँग्रेसला झटका देत ‘हा’ मोठा पक्ष करणार घरवापसी
दरम्यान, आता निवडणुका जवळ आल्याने महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी नेतेमंडळी किती जागा मिळतील, कोणत्या जागेवर कुणाचा दावा असेल याबाबत शक्यता व्यक्त करत आहेत. त्यानंतर आता नेते मंडळींचे भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत.