‘वंचित’बरोबर आघाडी होणार? वडेट्टीवार म्हणाले, आता दोन दिवसांत तिन्ही पक्ष…
Vijay Wadettiwar : महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. या पक्षांत जागावाटपाचा फॉर्म्यूलाही ठरल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे. या जागावाटपात काही जागा वंचित बहुजन आघाडीला देणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र, वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वंचित आघाडीची अद्याप महाविकास आघाडीशी पूर्णपणे युती झालेली नाही. तेव्हा युतीतील पक्ष बोलावत असतील तर त्यांच्या बैठकांना जाऊ नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाष्य केले आहे.
वडेट्टीवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले. त्यावर वडेट्टीवार म्हणाले, आमची चर्चा झालेली आहे. दोन दिवसांत तिन्ही पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा करतील. 5 किंवा 5 मार्चपर्यंत हा तिढा सुटलेला असेल असे वडेट्टीवार म्हणाले. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एका युवकाला काठीने मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. सरकार बेताल वक्तव्ये करणाऱ्यांवर कारवाई करत नाही. खून करणारे, जाहीर ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई होत नाही. हे सगळे सत्ता आणि सत्तेतून आलेल्या पैशांच्या मस्तीचा परिणाम आहे. त्यामुळे कितीही अन्याय झाला तर न्याय मिळेल हा गैरसमज आहे.
‘युती अजून नाही, बैठकांना जाऊ नका’; प्रकाश आंबेडकरांचा कार्यकर्त्यांना खास मेसेज
चार जागा फायनल झाल्यानंतर यादी येईल
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काल भारतीय जनता पार्टीने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीवरूनही वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दोन-दोन की तीन-तीन जागा द्यायच्या याचा निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राची यादी तयार झालेली नाही. जेव्हा चार-चार जागा अंतिम होतील तेव्हाच यादी जाहीर होईल, असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. युती अजून झालेली नाही. तेव्हा युतीत असणारे पक्ष बोलावत असतील त्या बैठकांना जायचं नाही, कार्यक्रमांनाही जायचं नाही. पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाही आणि तेही मी किंवा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर दिल्याशिवाय त्यावर विश्वास ठेऊ नका. कार्यकर्त्यांनी या सूचनांचे पालन करावे अशी त्यांना विनंती आहे.