प्रकाश आंबेडकरांनी सांगितला योगींचा फंडा, म्हणाले, कायद्याने आळा घालता येत नसेल तर..
Prakash Ambedkar : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशातील या कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडविणाऱ्या घटनेवर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकार हल्लाबोल सुरू केला आहे. या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
आंबेडकर यांनी रविवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील गोळीबाराची घटना, महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, महाराष्ट्र भूषण पुरस्कारांवरील वाद तसेच राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
धर्माधिकारी महाराष्ट्रभूषण पुरस्कार वादात पडणार नाही! पण…
उत्तर प्रदेशातील घटनेवर ते म्हणाले, ‘मुंबईत कोर्टात सुद्धा अंडरवर्ल्डची भांडणं ही बंदुकीच्या गोळीनं सेटल करण्यात आली होती. मला वाटतं आता तोच फंडा योगीने (Yogi Adityanath) सुरुवात केल्याचं दिसतंय. कायद्याने आळा घालायचा नाही तर गोळ्या घालून आळा घाला, अशी सगळी परिस्थिती आहे.’
‘उत्तर प्रदेश सरकारला अगोदरच सुप्रीम कोर्टाने कायद्याने राज्य करा असा सल्ला दिला होता. आता मात्र माओच्या भाषेत तिथे कारभार चालला आहे. तुम्हाला अतिरेकी किंवा गुंड ठरविण्यात येईल. आणि पोलीस तुम्हाला गोळ्या घालतील अशी परिस्थिती आहे. गोळ्या घालून खून करायचा आणि आपल्या समाजातील गुंडांना अभय द्यायचं ही परिस्थिती खूप धोकादायक आहे’, असे मी मानतो असे आंबेडकर म्हणाले.
‘त्या’ घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी! न्यायालय योग्य तो…
पुरस्कार मिळणाऱ्याचा समाज काढणे चूक
महाराष्ट्र भूषण पुरस्कार विशिष्ट समाजातील लोकांनाच दिला जातो असा आरोप होत आहे असा विचारले असता आंबेडकर म्हणाले, ‘पुरस्कार देण्याचा अधिकार शासनाचा आहे. पुरस्कार कुणाला द्यावा कुणाला देऊ नये हे ठरविण्याचा अधिकार शासनाचा आहे. पुरस्कार मिळणाऱ्याचा समाज काढू नये इतकेच माझे म्हणणे आहे. शासनाच्या वृत्तीवर टीका करा. पण ज्यांना पुरस्कार मिळालाय तो अमुकअमुक समाजाचा आहे असे म्हणून आरोप करणे हे चुकीचे आहे असे मला वाटते.’