‘हे तर महाराष्ट्राचे वैरी, बाळासाहेब असते तर’.. शिंदेंच्या कर्नाटक दौऱ्यावर राऊतांची आगपाखड

‘हे तर महाराष्ट्राचे वैरी, बाळासाहेब असते तर’.. शिंदेंच्या कर्नाटक दौऱ्यावर राऊतांची आगपाखड

Sanjay Raut Criticized Eknath Shinde : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा (Karnataka Elections) प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राज्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. राज्यातून भाजपाचे (BJP) नेते मंडळी कर्नाटकमध्ये तळ ठोकून आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) धुवाधार प्रचार करत आहेत. तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुद्धा कर्नाटकात दाखल झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या कर्नाटक दौऱ्यावरून ते आता विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदेंवर टीकास्त्र सोडले आहे. शिंदे हे भाजपाचा प्रचार करून मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत अशी टीका राऊत यांनी केली आहे.

राऊत यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात भारतीय जनता पक्षाच्या प्रचारास गेले आहेत. शिवसेना आमचीच.. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच असा डांगोरा ते रोज पिटत आहेत. आता काय ?, कर्नाटकचे बोम्मई म्हणतात महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक उचापती आहेत त्यांना आम्ही धडा शिकवू..आणि शिंदे त्याच बोम्मईंच्या पखाली वाहत आहेत. शिंदे व त्यांची टोळी सीमा भागात फिरकली नाही. उलट एकीकरण समितीच्या विरोधातील भाजपा उमेदवारांना खोके पाठवून मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला.

सीमा भागातील एकीकरण समितीचे उमेदवार पराभूत व्हावेत म्हणून शिंदे यांनी जोर लावला आहे. नकली शिवसेना! ढोंगी हिंदूत्व! हे तर महाराष्ट्राचे वैरी.
बाळासाहेबांनी या कृत्याबद्दल शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टीच केली असती.. एकशे पाच हुतात्म्यांशी ही बेइमानी आहे..महाराष्ट्र ही गद्दारी लक्षात ठेवील, असे राऊत यांनी म्हटले आहे.

‘मी मुख्यमंत्री कसा होतो, हे कोणी सांगण्याची आणि लिहण्याची गरज नाही’

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे कर्नाटकात दाखल झाले आहेत. येथे ते भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतील. तसेच कापू आणि उडुपीमध्ये भाजपाच्या रोड शोलाही ते उपस्थित राहतील.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube