महेश लांडगेंची गाडी सुसाट… ‘मविआ’चा उमेदवारच ठरेना!
स्वतः विद्यमान आमदार, जोडीला दोन विधान परिषदेचे आमदार, शेजारच्या दोन्ही मतदारसंघामध्ये मित्रपक्षांचे आमदार आणि कमी तिथे आम्ही म्हणायला असलेली माजी नगरसेवकांची फौज या सर्व जमेच्या बाजू ठरल्याने भोसरीचे विद्यमान आमदार आणि उमेदवार महेश लांडगे (Mahesh Landge) यांची गाडी आता सुसाट सुटली आहे. त्यांच्या विरोधातील उमेदवारच अद्याप ठरत नसतानाच लांडगे यांनी प्रचारात घेतलेली आघाडी भुवया उंचावणारी आहे. आता या सगळ्या परिस्थितीही लांडगे यांना कोण टक्कर देऊ शकते? (Mahavikas Aghadi has not found a candidate against BJP candidate Mahesh Landge in Bhosari)
पाहुया लेट्सअप मराठीच्या या स्पेशल सिरिजमधून…
भोसरी मतदारसंघांमध्ये भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे. पण त्यापूर्वीच आपल्या प्रचाराचा धडाका त्यांनी सुरु केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आणि कोणाला जागा सुटणार यावरच सध्या चर्चा सुरू आहेत. जे इच्छुक आहेत ते आपल्या राजकीय भवितव्यासाठी पुन्हा इकडून तिकडे उड्या मारतानाही पाहायला मिळत आहेत.
पाच टर्मचे माजी नगरसेवक, एकसंघ राष्ट्रवादी असतानाचे शहराध्यक्ष अशी ओळख असलेले अजित गव्हाणे बंडानंतर अजित पवार यांच्यासोबत गेले होते. मात्र विधानसभा निवडणुकीची इच्छा असल्याने ते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परतले. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर तेच उमेदवार असतील अशी चर्चा आहे. पण अद्यापही त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला नाही.
Assembly Election : मोक्याच्यावेळी अजितदादांना मोठा धक्का; पवारांनी ‘नाना’ म्हणत ‘काटे’ फिरवले
याशिवाय महाविकास आघाडीकडून भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे, भाजपमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आलेले रवी लांडगे यांची विधानसभेची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. विलास लांडे हे सातत्याने शरद पवारांची भेट घेताना पाहायला मिळतात. त्यामुळे अजित गव्हाणे यांचे नाव चर्चेत जरी अव्वल असले तरी विलास लांडे भोसरीच्या राजकारणातील वस्ताद आहेत, ते तर काही डाव टाकत नाहीत ना अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली सुरुवात झाली आहे.
रवी लांडगे 2017 मध्ये भाजपकडून बिनविरोध नगरसेवक झाले. त्यांना बिनविरोध निवडून आणण्यामध्ये भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचा मोठा वाटा होता. आता तेच रवी लांडगे विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेले आहे. भोसरी मतदारसंघ ठाकरे गटाला सुटेल आणि उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा त्यांना अजूनही विश्वास आहे. मात्र ठाकरेंना जागा सुटण्याची शक्यता कमी आहे.
मोठी बातमी : पुण्यात राजकीय ड्रामा; बंडखोरी करणाऱ्या बालवडकरांच्या मेव्हण्यावर IT चा छापा
दुसऱ्या बाजूला भाजप आमदार महेश लांडगे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला असून प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महेश लांडगे यांची ओळख आहे. शास्तीकर माफी असो किंवा इतर विकास कामांसाठी महेश लांडगे हे मतदारांच्या मनातील निर्णय घेतात असा विश्वास नागरिकांचा त्यांनी संपादन केला आहे. पैलवान असलेले लांडगे राजकीय डाव देखील तेवढ्याच ताकदीने टाकतात.
त्याचवेळी लांडगे यांच्यासोबत पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, चिंचवडचे भाजपचे उमेदवार शंकर जगताप, विधानपरिषदेचे आमदार उमा खापरे, अमित गोरखे यांची ताकद आहे. शिवाय महाविकास आघाडीमध्ये जागा कुणाला आणि कोण उमेदवार? हा घोळ मिटलेला नाही. त्यामुळे आमदार महेश लांडगेंची गाडी सुसाट पाहायला मिळत आहे. आता लांडगे यांना आगामी निवडणुकीमध्ये कुठला उमेदवार चॅलेंज करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.