महायुतीचा ‘देव’ देवेंद्रच! अंतर्गत कलह थांबायचं नाव घेईना, पुढील 2 महिन्यांत…

प्रशांत गोडसे, लेट्सअप प्रतिनिधी मुंबई
Devendra Fadanvis On Appointment Of Ministers OSD : महायुती (Mahayuti) सरकारमधील अंतर्गत कलह थांबायचं नाव घेत नाहीये. एकीकडे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये, तर दुसरीकडे आता ओएसडी आणि खाजगी सचिवांच्या नियुक्तीवरून नवीन संघर्ष सुरू झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओएसडी आणि खाजगी सचिवांच्या नियुक्तीबाबतच्या हस्तक्षेपामुळे महायुतीतील पक्षांच्या मंत्र्यांत नाराजी समोर येत आहे. स्वच्छ प्रशासनाच्या नावाखाली मात्र मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) आपल्या निर्णयावर ठाम आहेत. महायुतीतील या नवीन संघर्षामुळे आता वेगवेगळ्या चर्चा रंगू लागली आहे.
सरकारमध्ये आमचे कोणतेही अधिकार नाहीत, असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केलंय. नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नसल्यामुळे महायुतीत अंतर्गत नाराजी कायम आहे. सोमवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीरपणे कार्यक्रमात म्हणाले की , सरकारमध्ये आमचे कोणतेही अधिकार नाहीत. आमचे ओएसडी आणि वैयक्तिक सचिव (Ministers OSD and private secretaries) देखील मुख्यमंत्र्यांकडून नियुक्त केले जात असल्याबाबतची नाराजी व्यक्त करत महायुतीला घरचा आहेर दिला होता.
Video : स्वारगेट आगारात रोज बलात्कार; कंडोम अन् दारूच्या बाटल्या दाखवत वसंत मोरेंचं ‘खळ्ळखट्याक’
तर माणिकराव कोकाटे यांच्या या विधानावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांना माहिती नसावी की, खाजगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात. त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात, हे नवीन नाही असं म्हणत माणिकराव कोकाटे यांना फडणवीस यांनी टोला लगावला आहे. यावेळी सांगताना आपण मंत्रिमंडळ बैठकीत देखील स्पष्टपणे सांगितलं होतं की, तुम्हाला पाहिजे ती नावे पाठवा, ज्यांची नावे चुकीच्या कामात आली आहे. त्यांना फिक्सर म्हणून समजलं जातं. त्यांना आपण मान्यता देणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. 125 जणांची नावे माझ्याकडे आली होती. त्यातील 109 नावांना मी मंजुरी दिली असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.
विरोधक कोंडीत पकडणार
कलंकित ओएसडी आणि त्यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवणाऱ्या मंत्र्यांचे नाव मागून विरोधक मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तशा प्रकारची नावे पाठवणाऱ्या मंत्र्यांची नावे जाहीर करावी, असं विरोधकांनी लावून धरलंय. मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री गणेश नाईक, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार मंत्री, माणिकराव कोकाटे आणि बाबासाहेब पाटील यांच्याकडील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्री जयकुमार रावल आणि राज्यमंत्री इंद्रायणी नाईक यांच्या खाजगी सचिवांच्या नियुक्तीचा आदेश देखील जारी करण्यात आला आहे.
सुरेश धसांची ‘ती’ विनंती अन् आंदोलन स्थगित, मस्साजोगमध्ये नेमकं काय घडलं?
प्रायव्हेट सेक्रेटरी (खाजगी सचिव ) शासकीय सेवेतील उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी या पदावर नियुक्त केले जातात. शासनाच्या योजना आणि सदर मंत्राची माहिती या अधिकाऱ्यांना असते. ऑफिसर ऑफ स्पेशल ड्युटी म्हणजेच ओएसडी या पदावरील व्यक्तीची नियुक्ती सदर मंत्री करू शकतो, मात्र त्या प्रकारची मंजुरी मुख्यमंत्र्यांकडून घ्यावे लागते. पर्सनल असिस्टंट म्हणजे स्वीय सहाय्यक. आमदार, मंत्री हे आपल्या हवे असलेले कर्मचारी या पदावर घेऊ शकतात. स्वीय सहाय्यक हा मदतनीस म्हणून हा काम बघत असतो.
आरोप-प्रत्यरोपाची खेळी
ओएसडी आणि पीएस नेमण्यावरून एका बाजूला नाराजी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन मंत्री संदीपान भुमरे यांच्या ओएसडीकडून आपल्याकडून पाच कोटीच्या कामासाठी पाच लाख रुपये मागण्यात आले होते, असा दावा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेचे एक प्रकारे समर्थन अमोल मिटकरी करत आहेत.
भाजपकडून सुरू असलेल्या हालचालींमुळे महायुतीतील सत्तासंतुलन बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे गटासाठी पुढील काही महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे भाजप-शिंदे गट यांच्यातील राजकीय नातेसंबंध भविष्यात कोणत्या वळणावर जातात? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.