मंत्री विखे फोन उचलत नाही, महाजन-चव्हाणांबाबत तोच अनुभव; अजितदादांचे आमदार संतापले
MLA Amol Mitkari Criticized BJP Ministers : राज्यात विधानसभा निवडणुका सुरू असतानाच महायुतीत (Maharashtra Elections) खटके उडू लागले आहेत. महायुतीत सगळे काही ठिक चालल्याचा मेसेज दिला जात असला तरी नेते मंडळींकडूनच खदखद बाहेर येत आहे. आताही असाच एक प्रकार घडला आहे ज्यातून महायुतीत धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजप मंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत चार मंत्र्यांवर निशाणा साधला. लोकांच्या प्रश्नांसाठी चार वेळा संपर्क केला पण विखे पाटलांनी मोबाइल उचललाच नाही, अशी टीका आमदार मिटकरी यांनी केली.
राधाकृष्ण विखे पाटील अकोला जिल्ह्याचे (Akola News) पालकमंत्री आहेत. पण मागील सहा महिन्यांपासून ते जिल्ह्यात फिरकलेच नाहीत. मी काल एका प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी त्यांना वारंवार फोन करत होतो. मात्र त्यांनी काही फोन उचलला नाही. त्यांचे स्वीय सहायक, ओएसडीनेही फोन घेतला नाही. शेवटी मी तहसीलदारांना फोन केला. ही गोष्ट फक्त मंत्री विखे पाटील यांच्याबाबतीत नाही तर गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण आणि सुरेश खाडे यांच्याबाबतही तोच अनुभव आहे, अशा शब्दांत मिटकरींनी नाराजी व्यक्त केली.
संकटातून वाचवण्यासाठी बीडच्या बप्पाचा दादांना फोन, सोनवणेंबाबत मिटकरींचा खळबळजनक दावा
महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री सर्व पक्षांच्या आमदारांना मदत करतात मात्र भारतीय जनता पार्टीचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांना मदत करत नाहीत असा गंभीर आरोपही मिटकरी यांनी यावेळी केला.