राज्यात ठोकशाही सुरु झाली का? भिक्षुक मृत्यू प्रकरणावरून रोहित पवार संतापले

Rohit Pawar On Beggar Death Case : जिल्हा रुग्णालयात चार भिक्षुकांचा मृत्यू झाला यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. ते भिक्षुकच नव्हते असा आरोप मयतांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांनतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे. भिक्षेकरुंच्या मृत्यूबाबत आता कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCPSP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील प्रशासनावर टीका केली आहे.
शिर्डीत भिक्षुक असल्याच्या आरोपाखाली 51 जणांना पकडून तुरुंगात डांबले, त्यात काहींची तब्येत बिघडली असता त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले, त्यात चार जणांचा मृत्यू झाला. या रुग्णांना पाणी देण्यात आले नाही, राज्यात ठोकशाही सुरू झाली का, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. असा शब्दात रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
हिटरलच्या नाझीशाहीप्रमाणे यंत्रणा वागायला लागल्या तर…
शिर्डीत भिक्षुक असल्याच्या आरोपाखाली 51 जणांना पकडून तुरुंगात डांबले, त्यात काहींची तब्येत बिघडली असता त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले, त्यात चार जणांचा मृत्यू झाला. या रुग्णांना पाणी देण्यात आले नाही, एकाच रूममध्ये बांधून ठेवले अशा अनेक अमानवी गोष्टी समोर येत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या जखमा ओल्या असतानाच पुन्हा कोठडीत असा प्रकार घडल्याने राज्यात ठोकशाही सुरू झाली का, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. हिटलरच्या नाझीशाहीप्रमाणे इथल्या यंत्रणा वागायला लागल्या तर सामान्य माणसाचं रक्षण कोण करणार? सरकारने या प्रकरणाची त्वरित सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
शिर्डी येथे रामनवमीच्या पार्श्वभूमीवर भिक्षेकरी धरपकड मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पन्नास भिक्षेकरींना ताब्यात घेण्यात आलं होतं. पन्नास भिक्षेकरूंपैंकी चार जणांना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या चार भिक्षेकर्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही मोहीम प्रशासनाच्या चांगलेच अंगलट आल्याचं दिसून येत आहे.
ते भिक्षुकच नव्हते… नातेवाईकांचा आरोप
शिर्डी येथील भिक्षुकांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. शिर्डीमधील वाढती गुन्हेगारी तसेच या भिक्षुकांकडून व्यसनाधीनता केली जात आहे. यामुळे शिर्डीत वाढती गुन्हेगारी व अनुचित प्रकारांना आळा बसावा यासाठी या भिक्षुकांना ताब्यात घेण्यात आले होते. यापैकी चौघा भिक्षुकांचा नगर जिल्हा रुग्णलायत उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयतांमधील दोघा जणांच्या नातेवाईकांची ओळख पटली आहे.
सहकार निवडणूक! विखे – थोरात एक झाले अन् खताळ एकटे पडले
मयतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात येत मयत हे भिक्षुक नव्हतेच ते काम करून आपली उपजीविका करत होते असे सांगितले. तसेच प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये आमच्या नातेवाईकांना विनाकारण ताब्यात घेण्यात आले. ते खरच भिक्षुक होते का याची शहानिशा त्यांनी केली नाही असा आरोप नातेवाईकांनी केला.