राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद…आमदार जगतापांनी मनातली इच्छा बोलून दाखवली
आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत मनातली इच्छा माध्यमांसमोर बोलून दाखवलीयं.
Mla Sangram Jagtap : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच पक्षाचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Mla Sangram Jagtap) यांनीही या पदाबाबत आपली इच्छा अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचाच असेल, असे स्पष्ट करत त्यांनी संयमाची भूमिका मांडली. ते अहिल्यानगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना, “राज्याचं नेतृत्व पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केलं आणि त्या मुख्यमंत्री झाल्या तर मला आनंदच होईल, अशी भावना व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, अजितदादांशी सगळ्यांचीच जवळीक आहे. त्या भावनेतून दत्ता भरणे यांनी ते वक्तव्य केले असावे. मलाही तसंच वाटतं. मात्र, जोपर्यंत पक्षाचा अधिकृत निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नसल्याचं आमदार जगताप यांनी स्पष्ट केलंय.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत माध्यमांकडून सवाल केल्यानंतर आमदार जगताप म्हणाले, जसं सगळ्यांना वाटतं, तसंच मलाही वाटतं. मात्र प्रत्येकाची इच्छा पूर्ण होईलच असं नाही. ज्यांच्या वाट्याला संधी येईल, त्यांनाच जबाबदारी मिळेल. पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मनात जे असेल, त्यानुसार त्या योग्य व्यक्तीवर जबाबदारी सोपवतील अशी प्रतिक्रिया जगताप यांनी दिली आहे. जगताप यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चांना आणखी बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.
हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचं निधन की आत्महत्या?, कारमध्ये संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ
श्रीरामपूरची घटना दुर्देवी आहे. ज्याच्या घरात ही घटना घडते त्याची वेदना असते. घटनेचा निषेध आम्ही करतो. कुटुंबियांना आपण आधार दिला पाहिजे. श्रीरामपूरमध्ये अनेक केसेस आहेत. कोणीही कोणाचंही नाव गोवत असतं. प्रमुख आरोपी जामिनावर बाहेर येत असतो. विनाकारण राजकीय मंडळी दुसऱ्याचं नाव सांगून केसमध्ये नाव घालतात. ज्याच्या घरी घटना घडली त्याचे सांत्वनही राजकीय लोकं करत नाहीत, अशी प्रतिक्रिया आमदार जगताप यांनी श्रीरामपूर घटनेवर दिलीयं.