Ajit Pawar : आपण चुकलोय हे अजितदादांना समजलं; ठाकरेंच्या आमदारानं सांगितलं कारण
Ajit Pawar : मागील दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींमुळे अजित पवार (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. विरोधकांनीही याच मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचे काम सुरू केले. त्यानंतर काल राज्य सरकारने बारा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करत अजितदादांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री केले अजित पवारांची नाराजी कमी करण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या घडामोडी घडत असताना आता आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनीही अजितदादांच्या नाराजीवर भाष्य केले आहे.
नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सरकार स्थापन होण्याआधी अजित पवार आमच्याबरोबर होते. त्यावेळी भाजप त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होता. आता भाजपने त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले. मात्र, अजितदादांना आपण चुकलो, हे समजले आहे. त्यामुळे अजितदादा सत्तेबाबत नाराज आहेत. हे कालच्या दोन बैठकांतून दिसून आले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही आ. नाईक यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 1968 पासून दसरा मेळावा शिवतीर्थावरच होतो. तो तिथेच होईल. मेळाव्यात वर्षभरात कार्यकर्त्यांची उद्दिष्टे,कामे याबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतात. शिंदे गट मोदी-शहांना मानतो. मागील वर्षी याच भाषणात एकनाथ शिंदे उठून गेले होते. यावेळी तेच होणार आहे. त्यामुळे जर त्यांच्यात नीतिमत्ता शिल्लक राहिली असेल तर शिंदे गट दसरा मेळावा घेणार नाही, असे नाईक म्हणाले.
अजितदादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री
राज्य सरकारने काल राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली. तर पुणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या आणखी काही आमदारांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस आणि त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाच्या दौऱ्यातही अजितदादा (Ajit Pawar) दिसले नाहीत. ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, अजित पवार आजारी असल्याचे छगन भुजबळ आणि खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यावर अजितदादांचं हे आजारपण राजकीय असल्याचंही बोललं जात होतं. अखेर त्यांचं हे राजकीय आजारपण पालकमंत्री पदाच्या नियुक्तीनंतर बरं झाल्याचं बोललं जात आहे.