मी एक गुगली टाकली आणि लगेच रिप्लाय आला…निलेश लंके यांचा थेट विखेंवर निशाणा

MP Nilesh Lanke -आज सत्ता नसली तरी खचून जाण्याचे कारण नाही. राजकारण प्रवाही आहे. आज विरोधात असलेले उद्या सत्तेत येऊ शकतात.

  • Written By: Published:
Nilesh Lanke And Sujay Vikhe

MP Nilesh Lanke On Sujay Vikhe : मी एक गुगली टाकली आणि लगेच रिप्लाय आला. राजकारणात अशीच खेळी समजून घेतली पाहिजे. त्यामुळेच मी आमदार आणि खासदार होऊ शकलो, असे म्हणत खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke) यांनी माजी खासदार व भाजप नेते सुजय विखेंवर ( Sujay Vikhe) शाब्दिक निशाणा साधला.

कर्जुले हर्या येथे 2029 ची विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना लंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले, लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून निवडून दिले आहे. श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, राहुरी, पाथर्डी, नगर शहर, नगर तालुका, पारनेर या मतदारसंघांना न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी त्यासाठी पूर्णतः सक्षम आहे. राजकारणात कधी कधी जाणीवपूर्वक विधान करून प्रतिक्रिया पाहावी लागते. कोण आक्रमक होतो, कोण शांत राहतो, यावरून पुढील रणनीती ठरवता येते. प्रत्येक टीकेला उत्तर देत बसलो तर कामासाठी वेळ मिळणार नाही. त्यामुळे संयम राखणे अत्यंत गरजेचे आहे.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना लंके यांनी “आज सत्ता नसली तरी खचून जाण्याचे कारण नाही. राजकारण प्रवाही आहे. आज विरोधात असलेले उद्या सत्तेत येऊ शकतात. लढा आणि संयम ठेवा, असा संदेश दिला. त्यांनी शरद पवार यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत आहे. पवारसाहेब अनेक वर्षे विरोधात राहूनही कधी डगमगले नाहीत, असे सांगितले.

विरोधकांवर टीका करताना लंके म्हणाले, काहींना वाटते मी मावळलो आहे; मात्र ज्यांच्या जोरावर तुम्ही उड्या मारता, त्यांनाच घरी बसवण्याची ताकद माझ्यात आहे. डबक्यातल्या बेडकाला वाटते तेच जग आहे; पण बाहेरचे जग खूप मोठे आहे.

कार्यकर्त्यांवरील अन्यायाचा उल्लेख करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. “भोळ्या-भाबड्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये. ज्यांनी काम केले नाही त्यांनी लोकांना फसवू नये, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच मी साधा माणूस आहे. अडचणी येतात, पण संयम ठेवून पुढे गेल्यास यश मिळते,” असेही ते म्हणाले.

follow us