Maharashtra Politics : नवाब मलिक कोणत्या गटात? वाद वाढल्यानंतर पटेलांनी दिलं उत्तर
Maharashtra Politics : माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावरून (Nawab Malik) राज्याच्या राजकारणात कालपासून जो गदारोळ (Maharashtra Politics) सुरू झाला आहे त्यात अजित पवार गट एकाकी पडल्याचं दिसत आहे. फडणवीस यांनी पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यानंतर शिंदे गटानेही फडणवीसांच्या मताशी सहमती दर्शवली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट बोलणे टाळले. मलिक यांचं म्हणणं ऐकल्यानंतर मत मांडू असं अजितदादा म्हणाले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नवाब मलिक यांच्याबरोबर आमची कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. काल मलिक पहिल्यांदाच विधिमंडळात आले. सहकारी म्हणून त्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. निवडणूक आयोगाकडे जी आमदारांची यादी आम्ही दिली आहे त्यातही मलिक यांचे नाव नाही. त्यामुळे ते आमच्याबरोबर नाहीत. मधल्या काळात राष्ट्रवादीत ज्या घडामोडी घडल्या त्यात मलिक कुठेही नव्हते. आम्ही नवाब मलिक यांची भू्मिका काय, त्यांनी काय करायचं. त्यांची उद्याची वाटचाल काय असेल यावर काहीच चर्चा केलेली नाही. सध्या वैद्यकिय कारणामुळे बाहेर आहेत. त्यामुळे या विषयावर आम्हाला चर्चाच करायची नाही, असे पटेल यांनी सांगितले.
‘मलिक कोणत्या गटात माहित नाही, पत्राचं काय करायचं ते मी करीन’ फडणवीसांच्या पत्रावर अजितदादांचा भडका
मलिक यांना विधानसभेत बसण्याचा अधिकार आहे. म्हणून ते आले. आल्यावर कुणाला भेटले म्हणजे आम्ही त्यांना पुरस्कृत करतो किंवा दुसरा कुणी करतो असे वक्तव्य करणे चुकीचे आहे, असे पटेल यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी काही पत्र लिहिलं असेल तर त्याचा वेगळा अर्थ काढण्याची काहीच गरज नाही. नवाब मलिक आमच्याकडे की दुसरीकडे हा प्रश्न निर्माण केलेला नाही, ज्यावेळी होईल त्यावेळी पाहू असेही पटेल म्हणाले.
मलिकांबरोबरील काय झाली चर्चा
वैद्यकिय कारणांमुळे नवाब मलिक (Nawab Malik) सध्या जामिनावर आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. त्यांची भेट घेतली फक्त त्यांच्या प्रकृती चौकशी करण्यासाठी घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवाब मलिकांची भूमिका काय असणार आहे यावर मी आता काहीच बोलू इच्छित नाही, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
‘तो’ शिष्टाचारही भाजपनेही पाळावा; मलिकांवरील फडणवीसांच्या पत्राला अजितदादा गटाचे प्रत्युत्तर