Rohit Pawar : ‘भाजपाने खोटं बोलणं थांबवाव नाहीतर’.. ‘टोल’वादात रोहित पवारांची उडी

Rohit Pawar : ‘भाजपाने खोटं बोलणं थांबवाव नाहीतर’.. ‘टोल’वादात रोहित पवारांची उडी

Rohit Pawar : राज्यातील टोलवरील वसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हलक्या वाहनांकडून टोल घेतला जात नाही असं वक्तव्य केलं आणि या वादाला अधिकच धार चढली. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या वक्तव्याची शहानिशा करणार तसेच टोलनाक्यावर जर कुणी अडवलं तर टोलनाकाच जाळून टाकण्याचा इशारा दिला. त्यानंतर विरोधकांनी या मुद्द्यावर राज्य सरकारची कोंडी करायला सुरुवात केली असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपची खोटं बोलण्याची सवय जाणार तरी कधी?, असा सवाल त्यांनी केला.

राज्यात ‘टोल’ घोटाळा; राज ठाकरेंच्या गंभीर आरोपांवर फडणवीसांच्या कार्यालयाचे स्पष्टीकरण

युवा संघर्ष यात्रेनिमित्त आ. पवार आज पुण्यात होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी टोलनाक्याच्या मुद्द्यावर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज ठाकरे टोलचा मुद्दा नेहमीच घेतात. जेव्हा केव्हा लोकसभा विधानसभा असते किंवा मुंबईची एखादी निवडणूक असते तेव्हा त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून हा मुद्दा घेतला जातो. पण, पुढं असं काय होतं की तो मुद्दा सगळेच जण विसरून जातात. आता त्यांनी जो मुद्दा घेतलाय तो आम्ही अधिवेशनात सुद्धा मांडला आहे तो आता मार्गी लावू या. जो टोल मुंबईत घेतला जायला नकोय पण घेतला जातो. सर्व प्रमुख रोड महापालिकेला हस्तांतरीत केले गेले आहेत. अशा परिस्थितीत जर टोल घेतला जात असेल तर तो बंदच झाला पाहिजे. फक्त आंदोलनापुरतं थांबू नये, अशी विनंती त्यांना करतो. आंदोलनात आम्हाला यायला सांगा आम्ही नक्कीच येऊ, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

काल फडणवीस साहेबांनी एक वक्तव्य केलं की खासगी वाहनांना टोल घेतलाच जात नाही. मला एक कळत नाही भाजपाची खोटं बोलण्याची सवय का जात नाही. त्यांनी केलेलं वक्तव्य खरं की खोटं हे तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून, सामान्य नागरिक म्हणून मुंबईला गेला असाल टोल सगळ्यांकडूनच घेतला जातो. त्यामुळे भाजपाची ही जी खोटं बोलण्याची प्रवृत्ती आहे ती थांबली पाहिजे नाहीतर लोकच त्यांना थांबवतील, असा इशाराही रोहित पवारांनी दिला.

महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांची शक्यता संपुष्टात; पुणे-चंद्रपूरचे बिगुल नव्या लोकसभेसोबतच वाजणार

करोडो रुपये परदेश दौऱ्यांवर घालवले जात आहेत पण त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. आता राज्यच एखाद्या कंपनीला चालवायला द्या, म्हणजे कुटुंब, पक्ष फोडाफोडीचा विषयच राहणार नाही. राज्यकर्तेच काँट्रॅक्टवर बसवू, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

कारवाई करा नोटीसा काढा, यात्रा काढणारच

जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या न्यायालयात याचिकेवर आता राहुल नार्वेकर यांना नोटीस आलेली आहे. यावर पवार म्हणाले, नोटीस आम्हाला येतील आणखी आमदारांना येतील त्यावेळी ते बघतील काय करायचं ते. आम्हाला तर वेगळ्या वेगळ्या नोटीसा येतात. मध्यंतरी प्रदूषण मंडळाचीही नोटीस आली होती. आम्ही एक दिवस आधी कारखाना चालवला असं काही लोकांचं म्हणणं होतं म्हणून माझ्यावर कारवाई झाली. आज आत्ता भाजपाच्या एका नेत्याचा कारखाना चालू आहे. त्याच्यावर कारवाई केली का? माझ्यावेळेस मी तर चालू केलाच नाही. पण माझ्याआधी दहा दिवस काही जणांनी कारखाने चालू केले मग केली का त्यांच्यावर कारवाई?, तुम्ही कारवाई करा नाहीतर नोटीस पाठवा या गोष्टी बाजूला ठेऊन आम्ही यात्रा तर करणारच, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

यानंतर पत्रकारांनी त्यांना कोणत्या भाजप नेत्याचा कारखाना सुरू आहे असा प्रश्न विचारला त्यावर रोहित पवार यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. तुम्ही पत्रकार आहात.य पत्रकार अभ्यास करतात तेव्हा सांगलीचा अभ्यास करतील, साताऱ्याचा अभ्यास आणि समजून घेतील की कुणाचा कारखाना सुरू आहे. सत्तेत असणाऱ्या लोकांकडून जो भेदभाव केला जात आहे त्याला आम्ही आजिबात घाबरत नाही. जी कारवाई करायची ती तुम्ही करू शकता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube