‘शरद पवारांना राजीनामा द्यायचाच नव्हता’; घटनाक्रम सांगत सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपू्र्वी लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली होती. या निर्णयाद्वारे त्यांनी भाकरी फिरवली खरी पण, त्यांचा हा निर्णय पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रुचला नाही. राजीनामा मागे घेण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर पवारांनीही राजीनाम मागे घेत नव्या जोमाने कामाला सुरुवातही केली. मात्र, या सगळ्यात पवारांनी राजीनामा का दिला? या प्रश्नाचं उत्तर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देत खळबळ उडवून दिली. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नेतृत्वात भाजपसोबत जायचं ठरलं होतं म्हणूनच शरद पवार यांनी राजीनामा दिला, असं विधान भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
सुळे यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली. सुळे म्हणाल्या, शरद पवार यांनी राजीनामा दिला होता. तो त्यांना द्यायचाच नव्हता. परंतु, सगळ्यांचा आग्रह होता की आपण भाजपाबरोबर जायचं. या आग्रहामुळे शरद पवार दुखावले गेले होते. ते दुखावले गेल्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांची राजीनामा देण्याची आजिबात इच्छा नव्हती. तुम्हाला ते नाट्य वाटत असेल पण, आमच्यासाठी ते वास्तव होतं.
भुजबळांनीच पवारांना आग्रह केला
शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर जनता, पक्षाचे कार्यकर्ते सहकाऱ्यांनी त्यांना विनंती केली. त्यावेळी पवार स्वतः म्हणाले होते की तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल. त्यावेळी भुजबळ म्हणाले होते कमिटी वगैरे काही चालणार नाही तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल. भुजबळांनीच पवारांना अध्यक्षपदी राहण्याचा आग्रह केला होता, असे सुळे यांनी स्पष्ट केले.
मद्य कंपनीनं दत्तक घेतली शाळा अन् ठेवला गौतमीचा कार्यक्रम; शरद पवारांच्या दाव्यानं खळबळ
काय म्हणाले होते भुजबळ?
शरद पवार यांनी राजीनामा देणं हे काही थेट झालेलं नव्हतं. 15 दिवस आधीच हा विषय झाला होता. मे महिन्यात ज्या गोष्टी घडल्या त्याच्या 15 दिवस आधी शरद पवारांच्या घरी चर्चा झाली होती. अजित पवारांना ती चर्चा माहिती असावी. त्यामध्ये असं ठरलं होतं की शरद पवारांनी राजीनामा द्यायचा. त्यानंतर सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करायचं आणि मग भाजपबरोबर जायचं. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. मला मात्र याबाबत त्यावेळी काहीच माहिती नव्हती.