जयंत पाटील यांच्या पराभवासाठी ‘जब मिल बैठे अजितदादा और वो तीन यार…’

जयंत पाटील यांच्या पराभवासाठी ‘जब मिल बैठे अजितदादा और वो तीन यार…’

– ऋषिकेश नळगुणे

पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या पराभवासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चांगलीच कंबर कसली आहे. अजितदादांनी जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक आणि भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील (Nishikant Patil) यांनाच आपल्याकडे खेचले आहे. त्यांना राष्ट्रवादीत घेत इस्लामपूर मतदारसंघातून तिकीटही जाहीर केले आहे. (Nishikant Patil has been nominated by NCP against Jayant Patil, state president of NCP Sharad Chandra Pawar.)

केवळ तिकीट जाहीर करुन अजितदादांनी निशिकांत पाटील यांना वाऱ्यावर सोडलेले नाही. त्यांच्या जोडीला जयंत पाटील यांचे दुसरे स्थानिक विरोधक, आमदार सदाभाऊ खोत आणि कधी जयंत पाटील यांना साथ देणारे, कधी विरोध करणारे माजी खासदार संजय पाटील या तिघांची अजितदादांनी मोटही बांधून दिली आहे. यातून आता जयंत पाटील यांच्याविरोधात चेहरा निशिकांत पाटील यांचा, प्रचार सभांमध्ये बोलण्याची जबाबदारी सदाभाऊंकडे आणि मतांचा मोठा गठ्ठा मिळवून देण्याची जबाबदारी संजयकाकांकडे असणार आहे. आपल्या देवगिरी बंगल्यावरुन हे गणित सेट करुनच अजितदादांनी इंदापूरला प्रस्थान केले.

Ajit Pawar

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज (25 ऑक्टोबर) देवगिरी बंगल्यावर जोरदार राजकीय खेळ्या केल्या. यात त्यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांना राष्ट्रवादीत घेतले. भाजपच्या दोन माजी खासदारांना आपल्याकडे वळवून घेतले. शिवसेनेचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांना गळाला लावून त्यांना शिरूरमधून उमेदवारी दिली. यातून त्यांनी एकप्रकारे आपण या निवडणुकीमध्ये तयारीनेच उतरणार असल्याची चुणूकच दाखवून दिली आहे. याच खेळीतून शरद पवार यांच्या पक्षाच्या विजयासाठी महाराष्ट्रभर फिरणाऱ्या जयंत पाटील यांनाही अडचणीत आणण्यासाठी अजितदादांनी डाव टाकला आहे. दोन पाटील आणि सदाभाऊ खोत यांची मोट बांधून देत भाजपचे सांगलीतील सगळे केडर जयंत पाटील यांच्याविरोधात उभे केले आहे. त्यामुळे जयंत पाटील इस्लामपूरमध्येच अडकून राहतील, ते फार काळ राज्यभर फिरणार नाहीत, याची दक्षता अजितदादांनी घेतली आहे.

आदित्य ठाकरेंविरुध्द CM शिंदेंची मोठी खेळी, वरळीतून मिलिंद देवरा रिंगणात…

निशिकांत पाटील हे मागील काही वर्षांपासून जयंत पाटील यांचे परंपरागत विरोधक म्हणून उभे राहिले आहेत. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी इस्लामपूर मतदारसंघ भाजपसाठी सुटणार अन् निशिकांत पाटील उभे राहणार अशी चर्चा होती. जयंत पाटील यांच्याविरोधात वातावरण निर्मितीही झाली होती. या वातावरण निर्मितीला इस्लामपूर पालिकेतील सत्तांतरणाची किनारही होती. पण ऐनवेळी जागा शिवसेनेला सुटली अन् गौरव नायकवडी यांना उमेदवारी मिळाली. त्यावेळी निशिकांत पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. निशिकांत आणि गौरव यांच्यात मतविभागणी झाली. पण तरीही जवळपास 72 हजार मतांच्या फरकाने जयंत पाटील विजयी झाले.

 

थोडक्यात जयंत पाटील यांचे विरोधक शेवटच्या क्षणी एकजूट राहत नाहीत, हा या मतदारसंघातील इतिहास आहे. 2009 चा अपवाद वगळता गेल्या 35 वर्षांत विरोधकांना जयंत पाटील यांच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्यास यश आलेले नाही. यावेळी मात्र अजित पवार यांनी इस्लामपूरसाठी आणखी एक रणनीती आखली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत अजित पवार यांनी एकास एक लढतीसाठी एकमत तयार केले आहे. यंदा गौरव नायकवडी आणि आनंदराव पवार यांनी शिवसेनेकडून उमेदवारीची मागणी केली होती. तर निशिकांत पाटील भाजपाकडून इच्छुक होते. पण दोन दिवसांपूर्वी घडामोडी घडल्या, निशिकांत पाटील यांना राष्ट्रवादीत घेण्याचे ठरले. पण अचानक पाटील यांचा पक्षप्रवेश होल्डवर ठेवत एकनाथ शिंदे यांनी गौरव नायकवडी यांना मुंबईला बोलावून घेतले. त्यांच्याशी चर्चा झाली, त्यानंतर एकास एक उमेदवार देण्याचे ठरवत निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

‘दलबदलू’ 4 वेळा निवडून आले, पण इंदापूरचा विकास केला नाही; अजितदादांनी घेतला हर्षवर्धन पाटलांचा समाचार

याच बैठकीत अजितदादांनी तासगाव-कवठे महांकाळचीही फिल्डिंग लावून दिली. संजयकाका पाटील हे दिवंगत आर. आर. पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. आबा जिवंत असेपर्यंत या दोघांचे एक दिवसही सख्य जमले नाही. अगदी तासगावमधील एखाद्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून नगरपालिका, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दोघांचे वेगळे तंबू असायचे. एक काळ तर असा होता की संजयकाका पाटील आणि आर. आर. पाटील हे दोघेही राष्ट्रवादीचेच आमदार होते. पण खुद्द शरद पवार यांनाही या दोघांचे समेट घडवून आणता आला नाही. आता याच संजयकाका पाटील यांना अजितदादांनी आर. आर. पाटील यांचे चिरंजीव आणि शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्याविरोधात उभे केले आहे. त्यामुळे तासगाव-कवठेमहांकाळची लढतही संपूर्ण राज्यभर गाजणार हे निश्चित आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube