निवडणूक आयोगाच्या निकालावर पंकजा मुंडेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या, “शिंदे आणि ठाकरे या दोघांनाही…”
बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (shiv sena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हं दिलं. यामुळे आता शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असणार आहे. आयोगाच्या या निर्णयाने ठाकरे गटाला (Thackeray group) मोठा धक्का बसला आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. तब्बल ५७ वर्षानंतर पहिल्यांदा ठाकरे घराण्याकडून शिवसेना आणि पक्ष चिन्हं हिसकावून घेण्यात आला आहे. यावर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?
पंकजा मुंडे यांनी आज महाशिवरात्रीनिमित्त बीडमध्ये वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी त्यांना निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. आज महाशिवरात्री आहे. त्यामुळे मी राजकीय प्रतिक्रिया देणार नाही. मात्र, ज्यांना चिन्ह मिळालं आणि ज्यांना नाही मिळालं, अशा दोघांनीही या निर्णयाला पुढे नेण्यासाठी ईश्वर शक्ती देवो”, असे त्या म्हणाल्या. पुढे बोलताना त्यांनी अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्याविषयी प्रतिक्रिया दिली. अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून मी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच आज कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्याच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला
दरम्यान, शुक्रवारी राज्याच्या विधिमंडळात आणि संसदेतील बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. त्यामुळे पक्षातील फुटीनंतर ८ महिन्यांनी उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना’ गमवावी लागली.